शमी भारतासाठी का खेळत नाहीये मला माहिती नाही अशा शब्दात भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी निवडसमितीवर टीका केली आहे. शमीने भारतासाठी शेवटची टेस्ट २०२३ मध्ये खेळला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम मुकाबल्यात शमी खेळला होता. यंदाच्या वर्षी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत शमी खेळला होता. २ फेब्रुवारी रोजी झालेला टी२० सामना शमीचा या प्रकारातला शेवटचा होता.

भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी निवडसमितीने शमीच्या नावाचा विचार केला नाही. या दौऱ्यात मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह ५ पैकी ३ टेस्ट खेळला. बुमराहच्या अनुपस्थितीत शमी टेस्ट खेळेल अशी अपेक्षा होती मात्र पूर्णपणे फिट नसल्यामुळे शमीची या दौऱ्यासाठी निवडच झाली नाही. मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठीही त्याची निवड झाली नाही. काही दिवसात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. मात्र या मालिकेसाठीही शमी संघात नाहीये. शमीची निवड न केल्याने गेल्या महिन्यातही सौरव गांगुलीने टीका केली होती.

‘शमी उत्तम गोलंदाजी करत आहे. फिट आहे. रणजी स्पर्धेत आपण त्याचा खेळ पाहतोच आहोत. त्याने त्याच्या खेळाच्या बळावर बंगालला जिंकून दिलं. निवडसमिती त्याचा खेळ पाहत असेल अशी आशा आहे. निवडसमिती आणि शमी यांच्यात संवाद होत असेल असंही वाटतं. फिटनेस आणि गुणकौशल्याचं म्हणाल तर हा जुना शमी आहे, ज्याला आपण ओळखतो. त्यामुळे तो भारतासाठी का खेळत नाहीये मला माहिती नाही. त्याने भारतासाठी टेस्ट, वनडे, टी२० अशा तिन्ही प्रकारात खेळायला हवं’, असं गांगुली म्हणाले.

भारत-दक्षिण आफ्रिका कोलकाता टेस्टच्या पार्श्वभूमीवर गांगुली पत्रकारांशी बोलत होते. शमी भारतासाठी न खेळण्याचं काही कारणच नाही असं ते म्हणाले. शमीने काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या रणजी स्पर्धेच्या हंगामात बंगालकडून खेळताना १५ विकेट्स पटकावल्या आहेत.