दक्षिण आफ्रिकेचे गॅरी कर्स्टन आता श्रीलंकेचे प्रशिक्षक असणार आहेत. नुकत्याच आटोपलेल्या टी२० वर्ल्डकप स्पर्धेत यजमान श्रीलंकेला सुपर८ फेरीतून गाशा गुंडाळावा लागला होता. या पराभवानंतर प्रशिक्षक सनथ जयसूर्या यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. १५ एप्रिल पासून कर्स्टन पदभार स्वीकारतील. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती दिली. दोन वर्षांसाठी कर्स्टन श्रीलंकेचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत असतील. १४ एप्रिल २०२८ कर्स्टन यांचा कार्यकाळ संपेल.

२०२७ वनडे वर्ल्डकपसाठी श्रीलंका संघाची मोट बांधणे हे कर्स्टन यांच्यापुढचं मुख्य आव्हान असणार आहे. हा वर्ल्डकप दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे इथे होणार आहे. कर्स्टन यांची नियुक्ती हे नॅशनल हाय परफॉर्मन्स सेंटरच्या कार्यपद्धतीत बदलाचं द्योतक आहे.

कर्स्टन हे भारतीय संघाचे २००८ ते २०११ या कालावधीत मुख्य प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनातच भारतीय संघाने २०११ वनडे वर्ल्डकपच्या जेतेपदावर कब्जा केला. २०११ ते २०१३ या काळात त्यांनी दक्षिण आफ्रिका संघाचं प्रशिक्षकपद भूषवलं. त्यांच्या कार्यकाळातच दक्षिण आफ्रिका संघाने कसोटी, वनडे आणि टी२० अशा तिन्ही प्रकारात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेण्याचा मान पटकावला. एप्रिल २०१४ मध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कर्स्टन यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. मात्र बोर्ड आणि त्यांच्यात बेबनाव झाल्याने कर्स्टन यांनी सहा महिन्यात राजीनामा दिला. नुकत्याच आटोपलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत कर्स्टन नामिबिया संघाचे मेन्टॉर म्हणून कार्यरत होते.

कर्स्टन यांनी दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व करताना १४,०८७ धावा केल्या आहेत. यामध्ये २१ कसोटी शतकं आणि १३ वनडे शतकांचा समावेश आहे.