Gautam Gambhir High Court: प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कर्णधार सूर्यकुमाक यादवच्या नेतृत्त्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक २०२६ चं जेतेपद आपल्या नावे केलं. भारताने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. याशिवाय मायदेशात टी-२० विश्वचषक जिंकणारा भारत जगातील पहिला देश ठरला. या विजयात भारताच्या सर्वच खेळाडूंचं उत्कृष्ट योगदान होतं. तर कोच गौतम गंभीरने मोक्याची क्षणी योग्य निर्णय घेत संघाच्या विश्वचषक विजयात मोलाची भूमिका बजावली. दरम्यान आता गंभीरने कोर्टात धाव घेतली आहे.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात पसरवल्या जाणाऱ्या खोट्या आणि बनावट बातम्या व दाव्यांमुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलून दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात गुन्हा दाखल करताना गौतम गंभीर यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या नावाचा आणि ओळखीचा गैरवापर केला जात आहे आणि त्यांच्या विरोधात खोटे दावे पसरवले जात आहेत.

गौतम गंभीरने १६ इंस्टाग्राम अकाऊंट्सविरुद्ध आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध खटला दाखल केला आहे. त्याने हा खटला दिल्ली उच्च न्यायालयाच्या कमर्शियल डिव्हिजनमध्ये दाखल केला आहे. त्याने २.५ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचीही मागणी केली आहे.

गौतम गंभीर यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, २०२५ च्या अखेरीपासून यूट्यूब, एक्स, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर त्यांच्या नावाने बनावट डिजिटल व्हीडिओ-फोटो तयार करण्यात आले आहेत. एआय, चेहरा बदलणे आणि आवाजाची नक्कल करणे यांसारख्या तंत्रांचा वापर करून त्यांच्या नावाने अनेक बनावट व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत, ज्यात ते अशी विधाने करताना दिसत आहेत जी त्यांनी कधीही केलेली नाहीत. त्यांच्या नावाने एक बनावट राजीनाम्याचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला, ज्याला २९ लाख व्ह्यूज मिळाले. दुसऱ्या एका क्लिपमध्ये गंभीर वरिष्ठ क्रिकेटपटूंबद्दल अशी टिप्पणी करताना दिसले, जी त्यांनी कधीही केली नव्हती.

गौतम गंभीरने JanKey Frames, Bhupendra Paintola, Legends Revolution, gustakhedits, cricket_memer45, GemsOfCrickets, Crickaiith, Sunny Upadhyay, आणि @imRavY_ यांसह अनेक सोशल मीडिया अकाऊंट्सविरुद्ध खटला दाखल केला आहे. गंभीरने २.५ कोटी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

याशिवाय कोच गंभीरने या सोशल मीडिया अकाऊंटवरून आपली खोटी माहिती काढून टाकण्याची मागणीही केली आहे. गौतम गंभीरने आपल्या दाव्यात म्हटलं आहे की, अज्ञात अकाऊंट्सने चुकीची माहिती पसरवण्यासाठी आणि त्यातून पैसे कमावण्यासाठी त्याची ओळख, नाव, चेहरा आणि आवाजाचा वापर केला आहे. यामुळे गंभीरला त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा लागला.