आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेतील टीम इंडियाचा प्रवास संपुष्टात आल्यानंतर प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांचा कार्यकाळही संपुष्टात आला होता. त्यानंतर राहुल द्रविडची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. दरम्यान, राहुल द्रविडशी तुलना करत गौतम गंभीरने माजी मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांच्याबाबत खोचक प्रतिक्रिया दिली आहे. 

रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात टीम इंडिया १ नंबर टेस्ट टीम बनली होती. भारताने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये विजय मिळवला होता. रवी शास्त्री यांनी भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेतील विजयाची तुलना १९८३ च्या विश्वचषक विजेतेपदाशी केली होती. त्यामुळे गंभीरने शास्त्री यांनी प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात भारतीय संघाबद्दल अतिशयोक्ती वक्तव्य केल्याबद्दल त्यांची खरडपट्टी काढली. 

गौतम गंभीरला मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांच्याबाबत विचारण्यात आले. तेव्हा टाईम्स नाऊशी बोलतांना गंभीर म्हणाला, “मला एक गोष्ट विचित्र वाटली ती म्हणजे जेव्हा तुम्ही चांगले खेळता तेव्हा तुम्ही स्वतःचीच प्रशंसा करत नाही. इतर लोक याबद्दल बोलत असतील तर ठीक आहे. आम्ही २०११ चा विश्वचषक जिंकला तेव्हा आमच्यापैकी कोणीही जगातील सर्वोत्तम संघ असल्याचे विधान केले नाही. तुम्ही जिंकल्यावर बाकीच्यांना बोलू द्या. तुम्ही ऑस्ट्रेलियात जिंकलात ही खूप मोठी गोष्ट होती, तुम्ही इंग्लंडमध्ये जिंकलात कारण तुम्ही चांगली कामगिरी केली होती आणि यात शंका नाही.”

गौतम गंभीर म्हणाला, “तुम्ही इतरांना तुमची प्रशंसा करू द्या, राहुल द्रविडच्या तोंडून तुम्ही अशा गोष्टी ऐकणार नाहीत. भारत चांगला खेळतो की वाईट. त्याची विधाने नेहमीच संतुलित राहतील. शास्त्री यांनी २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील विजयाला १९८३ च्या विश्वचषकापेक्षा मोठा विजय म्हटले होते.”

गंभीर म्हणाला, “तुम्ही चांगले खेळाल किंवा वाईट, नम्रता खूप महत्त्वाची आहे. मला वाटते की द्रविडचे सर्वात मोठे लक्ष एका चांगल्या खेळाडूला आधी चांगली व्यक्ती बनवणे असेल.”