Gautam Gambhir Comment on MS Dhoni Insta Post: भारताने विक्रमी तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक आपल्या नावे केला आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी देखील रविवारी, ८ मार्चला अहमदाबाद येथे झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होता. ऐतिहासिक विजयानंतर धोनीने भारतीय खेळाडूंचं खूप कौतुक केलं. धोनीने गौतम गंभीरसाठी खास दोन ओळी लिहिल्या आणि आता कोचनेही यावर दोन वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडियावर अनेकदा अफवा पसरतात की गौतम गंभीर आणि एमएस धोनी यांच्यात कटुता आहे. पण, दोघांनीही कधीही कोणत्याही मीडिया प्लॅटफॉर्मवर एकमेकांबद्दल वाईट बोललेलं नाही. आता, धोनी आणि गंभीर यांच्यातील अचानक झालेल्या मैत्रीमुळे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. गौतम गंभीर हा क्वचितच हसणारा माणूस आहे. तो मैदानावर नेहमीच गंभीर मूडमध्ये दिसतो. पण टीम इंडियाच्या विजयानंतर त्याच्या चेहऱ्यावरील हास्यामुळे केवळ माहीच नाही तर १.४ बिलियन भारतीयदेखील पाहत राहिले.
धोनीने भारताच्या विजयानंतर खास पोस्ट शेअर करत लिहिलं, “अहमदाबादमध्ये इतिहास घडला आहे. टीम, सपोर्ट स्टाफ आणि जगभरातील भारतीय क्रिकेट संघाच्या सर्व चाहत्यांचे खूप खूप अभिनंदन. तुम्हा सर्वांना खेळताना पाहून आनंद झाला. कोच साहेब चेहऱ्यावरील हे हसू छान वाटतंय. इंटेसिटीसह या स्माईलचं कॉम्बिनेशन अगदी कमाल आहे. खूप छान कामगिरी केली, आता त्याचा आनंद लुटा. बुमराहविषयी तर काही न लिहिणचं चांगलं आहे. तो चॅम्पियन बॉलर आहे.”
कोच गौतम गंभीरने धोनीच्या पोस्टवर काय कमेंट केली?
आता, गौतम गंभीरनेही एमएस धोनीच्या पोस्टवर उत्तर दिलं आहे. गौतम गंभीरने धोनीच्या पोस्टवर कमेंट करत लिहिलं आहे, “आणि हसण्याचं किती चांगलं कारण आहे! तुला भेटून खूप आनंद झाला.”

गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रं स्वीकारल्यापासून, सूर्यकुमार यादवच्या जोडीने टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाने नवीन उंची गाठली आहे. प्रथम, भारताने २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, त्यानंतर त्याच वर्षी टीम इंडियाने आशिया चषक जिंकण्यात यश मिळवलं आणि आता सूर्यासेनेने टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास घडवला आहे. गौतम गंभीर हे एकमेव भारतीय मुख्य प्रशिक्षक आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग दोन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. याशिवाय कोच आणि खेळाडू म्हणून वर्ल्डकप ट्रॉफी जिंकणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत आता गौतम गंभीरदेखील झाला आहे.
