Gautam Gambhir explains Vaibhav Suryavanshi playing 11 selection strategy: १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने भारतीय क्रिकेट तसेच क्रिकेट विश्वात आपल्या कामगिरीचा डंका वाजवला आहे. अवघ्या १५ वर्षे ९९ दिवस वय असताना त्याने इंग्लंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यासह तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात युवा भारतीय ठरला. वैभवने सचिन तेंडुलकरचा अनेक वर्षांपासून अबाधित असलेला विक्रमही आपल्या नावावर केला. पण पदार्पणानंतर आता वैभव सूर्यवंशीला खेळण्यासाठी प्रतीक्षा का करावी लागत आहे, याबाबत गौतम गंभीर यांनी सांगितलं.

भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीसोबत झालेल्या चर्चेबाबत भाष्य केलं आहे. चांगल्या फॉर्ममध्ये असूनही वैभवला आपल्या संधीसाठी प्रतीक्षा का करावी लागली, यामागचं कारणही गंभीर यांनी स्पष्ट केलं.

वैभव सूर्यवंशी हा पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वात युवा फलंदाज होण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या १५ वर्षे ११८ दिवस वय असताना अर्धशतक पूर्ण केलं. इतकी दमदार सुरुवात करूनही वैभवला अफगाणिस्तानविरुद्धच्या संपूर्ण मालिकेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. याशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी जपानविरुद्ध झालेल्या एकमेव टी-२० सामन्यातही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नव्हतं. तर श्रीलंकेविरूद्ध आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळताना त्याला २१ चेंडूत ३८ धावा करत चांगलं कमबॅक केलं.

गौतम गंभीरने वैभव सूर्यवंशीला कसं समजावलं होतं?

वैभवबरोबर याबाबत चर्चा करताना गंभीरने त्याला समजावून सांगितलं होतं की, एखादा खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असला तरी त्याला लगेच प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेलच असं नाही. जिओस्टारशी बोलताना गंभीर म्हणाला, “माझ्यासाठीही हा एक नवीन अनुभव होता. हो, तो चांगल्या फॉर्ममध्ये होता. पण मी त्याला समजावून सांगितलं की, काही वेळा अनेक वर्षांपासून चांगली कामगिरी करणारे खेळाडू संघात असल्यामुळे त्याला आपल्या संधीसाठी प्रतीक्षा करावी लागेल.”

गंभीरने यावेळी सोशल मीडियावरील चर्चा किंवा बाहेरचा दबाव याबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. तो म्हणाला, “आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडिया किंवा बाहेरचं वातावरण प्लेइंग इलेव्हन ठरवत नाही.”

गंभीर म्हणाला, “हे ड्रेसिंग रूममध्ये कोण आहे, प्रशिक्षक आणि कर्णधाराला कोण सामना जिंकून देऊ शकतं असं वाटतं किंवा सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन कोणती असेल, यावर अवलंबून असतं. तसेच इतक्या दीर्घकाळापासून चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाही विचार करावा लागतो. समजा वैभव आज खेळला, तर त्यासाठी मला अभिषेक किंवा संजू यांच्यापैकी ज्याला बाहेर बसवावं लागेल, त्याच्याशी कठीण चर्चा करावी लागेल. त्यामुळे गेल्या दीड-दोन वर्षांत ज्या संयोजनाने संघाला सातत्याने चांगले निकाल मिळवून दिले आहेत, त्याकडे आपण अचानक दुर्लक्ष करू शकत नाही,” असं गंभीरने सांगितलं.

“फक्त तीन-चार सामने खराब गेले म्हणून त्या खेळाडूंना संघाबाहेर करून, प्रतिभावान आणि सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या युवा खेळाडूला संघात घेणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे काही वेळा तुम्हाला तुमच्या संधीची प्रतीक्षा करावी लागते. कारण आम्हाला ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना सुरक्षित आणि विश्वासाचं वातावरण द्यायचं आहे,” असं गौतम गंभीरने संघ निवडताना काय निकष विचारात घेतले जातात हे सविस्तर समजावून सांगितलं.