Gautam Gambhir On Bengaluru Stampade: आयपीएल २०२५ चे विजेतेपद मिळवल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयोजित केलेल्या विजयोत्सवाच्या कार्यक्रमावर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने तीव्र शब्दांत टीका केली. या विजयोत्सवामुळे बंगळुरूमध्ये चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून ३३ जण जखमी झाले आहेत.
या घटनेवर बोलताना गौतम गंभीर म्हणाला की, “रोड शो करावेत असे मला कधीच वाटले नाही. २००७ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतरही मी खेळत असतानाही माझे असेच मत होते. लोकांचे जीवन खूप महत्वाचे असून, यापुढेही माझी अशीच भूमिका राहणार आहे.”
“भविष्यात अशा घटना घडून नयेत यासाठी आपल्याला अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. जे काही करायचे आहे ते बंद दाराआड किंवा स्टेडियमच्या आत करा. जे घडले ते खूप दुःखद आहे. यासाठी आपण सर्वजण जबाबदार आहोत. भविष्यात असे काहीही घडू नये अशी मला आशा आहे,” असे गंभीर पुढे म्हणाला.
भारताचा इंग्लंड दौरा
दरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्या २० जूनपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक आणि कसोटी संघाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिल यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत गंभीरने बंगळुरूत घडलेल्या दुर्दैवी घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर टीका केली.
मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाखांची मदत
३ जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवले. त्यानंतर ४ जून रोजी बंगळुरूमध्ये आरसीबीच्या पहिल्या आयपीएल विजेतेपदाचा आनंद साजरा करण्यासाठी अनेक चाहते मोठ्या संख्येने जमले होते. पण, एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर व्यवस्थेअभावी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये ११ चाहत्यांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान या घटनेनंतर आरसीबीने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
आरसीबी विरोधात गुन्हा
आयपीएल २०२५ च्या फायनलनंतर आरसीबीच्या विजय उत्सवासाठी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर जमलेल्या नागरिकांमध्ये झालेल्या चेंगराचंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. यानंतर आता या चेंगराचेंगरी प्रकरणी बंगळुरू पोलिसांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन, डीएनए नेटवर्क्स आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.