Gautam Gambhir Selection Controversy: कोच गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने आतापर्यंत दोन आयसीसी ट्रॉफी जिंकले आहेत. २०२५ मध्ये संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली. तर आता टी-२० विश्वचषक २०२६ चं जेतेपद टीम इंडियाने पटकावलं. गौतम गंभीरचं अनेक आजी माजी खेळाडूंबरोबर उत्तम बॉन्डिंग आहे. टी-२० विश्वचषकानंतर आता गंभीर चर्चेत असताना माजी खेळाडूने मोठा खुलासा केला आहे. गौतम गंभीर या माजी खेळाडूबरोबर २०१३ पासून एकही शब्द बोललेला नाही.

गौतम गंभीरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द मोठ्या सामन्यांतील दमदार कामगिरीसाठी ओळखली जाते. विशेषतः त्याने २००७ च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ७५ धावा आणि २०११ च्या वनडे विश्वचषकामध्ये ९७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला होता. तरीही, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजारांहून अधिक धावा करूनही गंभीरने अनेकदा आपली कारकिर्दीला अपूर्ण असल्याची भावना व्यक्त केली आहे.

२०१३ मध्ये गौतम गंभीरला संघातून वगळण्यात आलं होतं. तत्कालीन निवडकर्ते माजी खेळाडू संदीप पाटील होते. ज्यांनी गौतम गंभीरच्या जागी शिखर धवनला संधी होती. संदीप पाटील यांनी विक्की लालवाणी शोमध्ये यासंबंधित खुलासा केला. त्यांनी सांगितलं की, जवळपास दशकाहून अधिक काळ झाला तरी गंभीर त्यांच्याशी बोलत नाहीत, इतकंच नाही तर ते त्यांच्याकडे लक्षही देत नाहीत.

गौतम गंभीर माजी खेळाडू संदीप पाटील यांच्याशी का बोलत नाही?

गौतम गंभीर व संदीप पाटील यांच्यातील वादाची सुरुवात २०१३ मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान झाली होती. त्या वेळी संदीप पाटील यांच्या निवड समितीने मोठा निर्णय घेत गौतम गंभीर यांना संघातून वगळून उदयोन्मुख फलंदाज शिखर धवनला संधी दिली होती. धवनने मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८७ धावांची धडाकेबाज खेळी करत शानदार पदार्पण केलं. मात्र या निर्णयानंतर भारतासाठी अनेक वर्षे सलामी दिलेल्या आणि मोठे यश मिळवलेल्या गंभीरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा उतरता काळ सुरू झाल्याचे मानले जाते.

संदीप पाटील यांच्या मते, एकेकाळी त्यांचे आणि गौतम गंभीरचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. “तो मला खूप जवळचा होता. दौऱ्यांदरम्यान आम्ही एकत्र टेनिस खेळायचो. अनेक वर्षांपूर्वी मला प्रशिक्षकपदावरून हटवण्यात आलं तेव्हा ‘गौतम’ दर दोन आठवड्यांनी मला फोन करून विचारपूस करायचा.” मात्र, गंभीरला भारतीय संघातून वगळण्याचा निर्णय झाल्यानंतर हे नातं पूर्णपणे बदललं. त्या घटनेनंतर दोघांमधील जवळीक संपल्याचं पाटील यांनी सांगितलं.

विविध राष्ट्रीय न्यूज चॅनेलवरील कार्यक्रमांसाठी ते अनेकदा एकाच स्टुडिओमध्ये उपस्थित असतात, पण तरीही गंभीर त्यांच्याशी अजिबात संवाद साधत नाहीत. “गंभीर अजूनही नाराज आहे. त्या प्रसंगानंतर त्याने माझ्याशी बोलणं टाकलं. आम्ही अनेक टीव्ही शोमध्ये एकत्र आलो, एकाच खोलीत बसलो, पण गौतमने माझ्याकडे कधी पाहिलंसुद्धा नाही. प्रत्येक वेळी मी ‘हॅलो’ म्हटलं किंवा संवाद साधण्याचा प्रयत्न केला, तरी त्याने कधी प्रतिसाद दिला नाही, अगदी नजरही टाकली नाही. पण ठीक आहे,” असं पाटील म्हणाले.

मात्र, संदीप पाटील यांच्या मते इतर अनेक दिग्गज खेळाडूंनी संघातून बाहेर पडण्याचा निर्णय खूप शांतपणे आणि सन्मानाने स्वीकारला. व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांनी संघातून बाहेर पडताना कोणतीही नाराजी दाखवली नाही. पण गौतम गंभीर मात्र अजूनही नाराज आहे, कारण त्याला कधीच वाटलं नाही की त्याचा काळ संपला आहे. संदीप पाटील यांच्यासाठी मात्र हा त्यांच्या पदाची किंमत चुकवल्यासारखं आहे. “तो ( गौतम गंभीर) ना विसरणार आणि ना माफ करणार, पण मी त्याच्या निर्णयाचा आदर करतो.” असे पाटील म्हणाले.

गौतम गंभीरने २०१८ मध्ये सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. गंभीरने २०१३ च्या सुरुवातीला शेवटचा वनडे सामना खेळला. त्यानंतर २०१४ आणि २०१६ मध्ये कसोटी संघात अधूनमधून संधी मिळाली, पण त्याला पुन्हा कायमस्वरूपी स्थान मिळवता आलं नाही. यापूर्वी दिलेल्या मुलाखतींमध्ये गंभीरने सांगितलं होतं की, २००७च्या वर्ल्डकपसाठी संघातून वगळल्यानंतर त्याने क्रिकेट सोडण्याचाही विचार केला होता. नंतरच्या काळातही संघाबाहेर राहिल्यामुळे त्याला व्यवस्थेमुळे गुदमरल्यासारखं वाटत असल्याचं त्याने म्हटलं होतं.