Gautam Gambhir Selectors dispute over India Next T20I Captain: सूर्यकुमार यादवला भारताच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून काढण्यात आलं आहे. सूर्याला पदावरून पायउतार करण्यासाठी कर्णधारपद हा कधीच मुख्य मुद्दा नव्हता. मात्र, गेल्या बराच काळ टी-२० क्रिकेटमधील घसरती कामगिरी पाहता निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाचा संयम संपल्याचं दिसत आहे. सूर्यकुमार यादव याला भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात येणार असून, सुमारे १८ महिन्यांच्या निराशाजनक कामगिरीनंतर त्याचे संघातील स्थानही धोक्यात आलं आहे. पण आता पुढचा कर्णधार कोण यावर निवड समिती व गौतम गंभीर यांच्यात द्वंद्व असल्याचं समोर येत आहे.

रिपोर्ट्सनुसार श्रेयस अय्यर हे या पदासाठी सर्वात मजबूत दावेदार मानला जात आहे. डिसेंबर २०२३ नंतर त्याने भारतीय टी-२० संघाकडून एकही सामना खेळलेला नसला, तरी त्यांच्या नेतृत्वगुणांची सातत्याने चर्चा होत आहे. गेल्या तीन आयपीएल हंगामांत अय्यरने दोन वेगवेगळ्या संघांना अंतिम फेरीत पोहोचवलं आहे. यामध्ये २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला विजेतेपद मिळवून देण्याचाही समावेश आहे. त्यामुळे कर्णधारपदाच्या शर्यतीत त्याचा दावा अधिक मजबूत मानला जात आहे.

मात्र, भारतीय टी-२० संघाच्या नेतृत्वाचा निर्णय इतका सोपा नसल्याचेही मानले जात आहे. निवडकर्त्यांसमोर अनेक पर्याय उपलब्ध असून, आगामी काळात कोणाच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे श्रेयस अय्यर याला टी-२० संघाचे पुढील कर्णधार बनवण्याबाबत पूर्णपणे खात्रीशीर नाहीत.

गौतम गंभीर आणि श्रेयस अय्यर हे २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्याचा भाग होते. त्या वेळी गंभीर संघाचे मार्गदर्शक (मेंटॉर) होते, तर अय्यरने संघाला विजेतेपद मिळवून दिलं होतं. मात्र, विजेतेपदानंतरही आपल्या योगदानाला पुरेसे महत्त्व मिळाले नसल्याची भावना अय्यरने सार्वजनिकपणे व्यक्त केली होती. दरम्यान, भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदासाठी आणखी एक मजबूत दावेदार म्हणून तिलक वर्मा याचे नाव समोर येत आहे. निवड समितीतील अनेक सदस्यांचा त्याला पाठिंबा असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचे कमी वय आणि दीर्घकालीन नेतृत्वाची क्षमता लक्षात घेता तो भविष्यासाठी योग्य पर्याय असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

गौतम गंभीरचा श्रेयस अय़्यर नव्हे संजू सॅमसनला कर्णधार करण्याचा प्रस्ताव

बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितलं, “तिलक वर्माला श्रीलंकेत होणाऱ्या ‘अ’ संघाच्या मालिकेसाठी कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याच्या नेतृत्वगुणांची चाचणी घेण्याचा हा प्रयत्न आहे.” मात्र, रिपोर्ट्सनुसार गंभीरची पहिली पसंती संजू सॅमसन आहे. यंदाच्या टी-२० विश्वचषकात संजूने शानदार कामगिरी केली होती. स्पर्धेदरम्यान संघात संधी मिळाल्यानंतर त्याने अवघ्या पाच डावांत ३२१ धावा केल्या. त्याची सरासरी ८०.२५ तर स्ट्राईक रेट १९९.३७ इतका होता. विशेष म्हणजे, बाद फेरीतील सलग तीन सामन्यांत त्याने अर्धशतकं झळकावत भारताच्या विजेतेपदाच्या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली होती.