मुंबई : १४ वर्षांखालील वयोगटाच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत अपेक्षेप्रमाणेच सुनील गावस्कर संघाने सर्वाधिक नऊ गुणांसह विजेतेपद पटकावले. गावस्कर संघ २१३ धावांवर गारद झाल्यानंतरही शुक्रवारी रवी शास्त्री संघाला १३७ धावांत गुंडाळून त्यांनी आपले जेतेपद निश्चित केले. २८ धावांत ६ बळी मिळवणारा ऑफ-स्पिनर गजानन नारपगोल हा त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. शास्त्री संघाच्या स्मिन किणी २८ आणि दैविक सावे ५२ यांचा अपवाद वगळता त्यांचे अन्य फलंदाज साफ अपयशी ठरले.

दुसऱ्या सामन्यात सचिन तेंडुलकर संघाने ७ बाद २९९ धावांवर आपला डाव घोषित केला. या आव्हानाचा पाठलाग करताना दिलीप वेंगसरकर संघाने ५ फलंदाज १०९ धावांत गमावले होते. मात्र त्यानंतर आयुष शेटय़े (१०२) आणि तनिश शेट्टी (१०२) यांनी झुंजार फलंदाजी केली. त्यामुळे वेंगसरकर संघाने ७ बाद ३०२ धावा केल्या. आयुष शेटय़े स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज, गजानन नारपगोल सर्वोत्तम गोलंदाज आणि वेदांत गोरे सर्वोत्तम क्षेत्ररक्षक ठरला.

वेंगसरकर यांचे योगदान अतुलनीय -शेट्टी

मुंबई : माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचे क्रिकेटसाठीचे योगदान अतुलनीय आहे. गेली २७ वर्षे ते अकादमीच्या माध्यमातून युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत असून या माध्यमातून त्यांनी मुंबई आणि भारताला कितीतरी क्रिकेटपटू दिले आहेत, असे गौरवोद्गार क्रिकेट संघटक प्रा. रत्नाकर शेट्टी यांनी काढले. ‘‘खेळाडूंनी नेहमी संधी मिळाल्यानंतर आपला सर्वोत्तम खेळ पेश करावा. आपल्यावर अन्याय झाला, म्हणून नाराज न होता आपले नाणे किती खणखणीत आहे, ते आपल्या कामगिरीनेच सिद्ध करून दाखवावे,’’ असा सल्ला वेंगसरकर यांनी दिला.