UP Gen Z Cricketers protest Ekana Stadium Lucknow demand 3 Ranji Trophy teams: विद्यार्थ्यांच्या पावलावर पाऊल टाकत, आता ‘जेन झी’ (Gen Z) मधील क्रिकेटपटूही रस्त्यावर उतरले आहेत. लखनौमधील अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमबाहेर २५० हून अधिक युवा खेळाडूंनी आपल्या पालकांच्या उपस्थितीत आंदोलन केलं. उत्तर प्रदेशसाठी केवळ एक नव्हे, तर तीन रणजी क्रिकेट संघ असावेत, अशी मागणी करणे हा या आंदोलनाचा उद्देश आहे.
जेन झी क्रिकेटपटू आणि त्यांच्या पालकांनी रविवारी लखनौच्या इकाना स्टेडियमबाहेर अनोख्या मागणीसाठी आंदोलन केलं. उत्तर प्रदेशसाठी एक नव्हे, तर तीन रणजी ट्रॉफी संघ असावेत, अशी त्यांची मागणी आहे. उत्तर प्रदेश क्रिकेट प्लेयर्स असोसिएशन आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ पूर्वांचल यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात सुमारे २५० युवा क्रिकेटपटू आणि त्यांचे पालक सहभागी झाले होते. उत्तर प्रदेश हे मोठं राज्य असून, संपूर्ण राज्यातील युवा क्रिकेटपटूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये संधी मिळण्यासाठी केवळ एका रणजी संघावर अवलंबून राहणं योग्य नाही, असा त्यांचा युक्तिवाद आहे.
त्यामुळे राज्यात तीन रणजी ट्रॉफी संघ तयार करण्यात यावेत, जेणेकरून उत्तर प्रदेशातील विविध भागांतील युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुढे जाण्याची समान संधी मिळेल, अशी आंदोलकांची मागणी आहे. या आंदोलनात प्रामुख्याने पूर्वांचल आणि मध्य उत्तर प्रदेशातील क्रिकेटपटू सहभागी झाले होते. राज्यात तीन स्वतंत्र क्रिकेट संघटना स्थापन करण्यात याव्यात आणि त्यांच्यामार्फत तीन रणजी ट्रॉफी संघ मैदानात उतरवण्यात यावेत, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
उत्तर प्रदेश क्रिकेट प्लेयर्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष अरविंद सिंह यांनी PTIला सांगितलं की, उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात एकापेक्षा अधिक रणजी संघ असावेत, अशी भूमिका मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यापूर्वीही मांडली होती. सिंह यांच्या मते, उत्तर प्रदेशची सुमारे २५ कोटी लोकसंख्या पाहता राज्यात तीन क्रिकेट संघटना आणि त्यानुसार तीन रणजी ट्रॉफी संघ असणं गरजेचं आहे. एकाना स्टेडियमवर करण्यात आलेल्या आंदोलनाचा उद्देश ही मागणी पुन्हा एकदा चर्चेत आणणं हा होता.
मात्र, क्रिकेटपटूंच्या समस्या केवळ रणजी ट्रॉफीपुरत्या मर्यादित नाहीत. पूर्वांचल आणि मध्य उत्तर प्रदेशातील क्रिकेटपटूंना सुरू असलेल्या उत्तर प्रदेश टी-२० लीगमध्येही डावललं जात असल्याचा आरोप अरविंद सिंह यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या सुरू असलेल्या उत्तर प्रदेश टी-२० लीगमधील सहा संघांमध्ये सुमारे १५० खेळाडू सहभागी आहेत. मात्र, त्यापैकी केवळ १६ खेळाडू पूर्वांचल आणि मध्य उत्तर प्रदेशातील आहेत. याउलट, पश्चिम उत्तर प्रदेशातील नऊ जिल्ह्यांमधून तब्बल ८९ खेळाडू या लीगमध्ये खेळत आहेत. तर दिल्लीतील आठ खेळाडूंचाही या स्पर्धेत समावेश आहे.
खेळाडूंच्या संख्येतील ही तफावत दाखवून देणारी आणखी एक बाब असल्याचा दावा संघटनेने केला आहे. उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यासाठी एकच क्रिकेट संघटना आणि एकच रणजी संघ असल्यामुळे राज्यातील सर्व युवा क्रिकेटपटूंना समान संधी मिळत नाही, असं संघटनेचं म्हणणं आहे. आता आंदोलनकर्त्यांनी आपली ही मोहीम आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबरमध्ये ‘मोठं आंदोलन’ करण्याची तयारी सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.
