‘तो देखणा आहे. अचूक टप्प्यावर शिस्तबद्ध गोलंदाजी करतो. तंत्रशुद्ध फलंदाजीही करतो. क्षेत्ररक्षण चैतन्यमयी असतं’, अशा शब्दात इंग्लंडचे माजी फलंदाज जेफ्री बॉयकॉट यांनी अष्टपैलू रवींद्र जडेजा याचं कौतुक केलं आहे. ३७वर्षीय जडेजाने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या मालिकेत ८ विकेट्स पटकावल्या होत्या. स्टिक टू क्रिकेट पॉडकास्टमध्ये डेव्हिड लॉइड, मायकेल वॉन, फिल टफनेल आणि अ‍ॅलिस्टर कुक यांनी बॉयकॉट यांच्याशी संवाद साधला.

नव्या पिढीतला तुमचा आवडता खेळाडू कोण? असं बॉयकॉट यांना विचारण्यात आलं. मायकेल वॉन यांनी त्यांना ‘फॅब फोर’ अर्थात विराट कोहली, जो रुट, केन विल्यमसन आणि स्टीव्हन स्मिथ यांची आठवण करून दिली. ते यांच्यापैकी कुणाचं तरी किंवा एखाद्या फलंदाजाचं नाव घेतील असं वाटलं होतं. मात्र बॉयकॉट यांनी जडेजाचं नाव घेतलं.

ते म्हणाले, ‘रवींद्र जडेजा सुरेख गोलंदाजी करतो. त्याचं क्षेत्ररक्षण चित्त्यागत आहे. तो फलंदाजीही करतो. बॅटपॅड एकत्र ठेऊन, डोकं संतुलित स्थितीत अशा पद्धतीने संयमी फलंदाजी करतो. तो देखणाही आहे. मी अलीकडेच त्याला भेटलो. त्याला भेटण्याची माझी पहिलीच वेळ होती. भारत दौऱ्यादरम्यान माझी जडेजाशी भेट झाली. मी त्याला भेटलो आणि सांगितलं की तू माझा आवडता खेळाडू आहेस’. तो त्वरित म्हणाला, ‘काहीही काय’. मी त्याला म्हणालो, ‘खरंच आहेस’.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत जडेजाने आणखी एक विक्रम नावावर केला. कसोटी प्रकारात ४००० धावा आणि ३५० विकेट्स अशी दुहेरी कामगिरी करणारा जडेजा केवळ चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. इयान बॉथम, डॅनियल व्हेटोरी, कपिल देव यांच्या मांदियाळीत जडेजाचा समावेश झाला.

‘जडेजा एक अव्वल खेळाडू आहे आणि एखाद्या क्रिकेटपटूबद्दल ज्या गोष्टी आवडू शकतात त्या सगळ्या जडेजा करतो’, असं बॉयकॉट म्हणाले. वर्षभरापूर्वीही बॉयकॉट यांनी जडेजावर स्तुतीसुमनं उधळली होती. ते म्हणाले होते, ‘जडेजाचा खेळ मला नेहमीच आवडतो. सामन्यात काय सुरू आहे याचं भान त्याला असतं. डावखुरी फिरकी टाकतो आणि त्याचं क्षेत्ररक्षण अचंबित करणारं आहे. मला असं वाटतं तुम्ही संघासाठी बॅट किंवा बॉलने योगदान देत आहात. पण तुमच्या अन्य गुणकौशल्याबद्दल कोणी बोलत नसेल. तसं जडेजाबद्दल होतं. त्याच्या कामगिरीतून तो बाकीच्यांना प्रेरणा देतो. क्षेत्ररक्षण करताना त्याचा चपळ वावर अचंबित करणारा असतो. तो उत्तम फलंदाजीही करतो. नेहमी हसतमुख असतो पण आतून अतिशय खंबीर आहे. त्याची ऊर्जा, हास्य, निग्रह आणि संघासाठी सर्वस्व झोकून देण्याची तयारी यामुळे तो वेगळा ठरतो’.

आधुनिक काळातल्या महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये जडेजाचा समावेश होतो. भारताचं प्रतिनिधित्व करताना जडेजाने ३७५ सामन्यात त्याने ७५८० धावांसह ६४२ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये ६ शतकी खेळींचा समावेश आहे. त्याने १७ वेळा डावात ५ विकेट्स घेण्याची करामत केली आहे. २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या तसंच २०२४ टी२० वर्ल्डकपविजेत्या संघाचा जडेजा अविभाज्य भाग होता. २०१२ ते २०२५ या कालावधीत रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडगोळीने भारतात खेळताना प्रतिस्पर्धी फलंदाजांना सातत्याने जेरीस आणलं आहे. या जोडगोळीमुळेच भारतीय संघाने मायदेशात दशकभर वर्चस्व गाजवलं.