कॉन्फेडरेशन फुटबॉल स्पर्धा
युवा संघासमोर अंतिम फेरीत चिलीचे आव्हान; गोरेत्झका, वेर्नेर व युनेसची मोलाची भूमिका
विश्वविजेत्या जर्मनी संघाने कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पध्रेच्या अंतिम फेरीत ऐटीत प्रवेश केला. युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या जर्मनीने ४-१ अशा फरकाने मेक्सिकोचा धुव्वा उडवला. लिऑन गोरेत्झकाने अवघ्या आठ मिनिटांत दोन गोल करून जर्मनीला दमदार सुरुवात करून दिली. त्याला टिमो वेर्नेर आणि आमीन युनेस यांनी प्रत्येकी एक गोल करून चांगली साथ दिली. आता रविवारी जर्मनीला अंतिम फेरीत चिलीच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.
सोची येथील फिस्ट स्टेडियमवर झालेल्या या लढतीत जर्मनीचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र या युवा संघाकडे दबावाखाली खेळण्याचा अनुभव नसल्याने मेक्सिकोचे आव्हान परतवण्यात ते किती यशस्वी होतील, याबाबत साशंकता होती. सामन्याच्या सहाव्या मिनिटाला जर्मनीच्या संघाने उत्तम खेळाचा नजराणा पेश करून या सर्व शंका मागे टाकल्या. गोरेत्झकाने बेंझामिन हेन्रीक्सच्या पासवर गोल करत जर्मनीला आघाडी मिळवून दिली. अवघ्या दोन मिनिटांत गोरेत्झका आणि वेर्नेर या जोडीची अफलातून जुगलबंदी पाहायला मिळाली. वेर्नेरच्या पासवर गोरेत्झकाने सहज गोल करत जर्मनीला २-० असे आघाडीवर आणले.
सुरुवातीच्या दहा मिनिटांच्या या खेळाने सामन्याचे चित्र स्पष्ट केले, परंतु मेक्सिकोकडून सातत्याने आक्रमण सुरू झाल्याने सामन्याला कलाटणी मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली. जर्मनीचा गोलरक्षक टेर स्टीगनने मेक्सिकोचे आक्रमण चोखपणे थोपवले. पहिल्या सत्रातील २-० अशा आघाडीत मध्यंतराला वेर्नेरने भर टाकली. ५९व्या मिनिटाला जोनास हेक्टरच्या पासवर त्याने गोल केला. ८९व्या मिनिटाला मार्को फॅबीयनने मेक्सिकोचे खाते उघडले, परंतु अवघ्या दोन मिनिटांत जर्मनीकडून त्याला प्रत्युत्तर मिळाले. युनेसच्या गोलने जर्मनीच्या विजयावर ४-१ अशी शिक्कामोर्तब केली.
०४ : कॉन्फेडरेशन चषक स्पध्रेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा जर्मनी हा चौथा युरोपियन देश आहे. याआधी डेन्मार्क (१९९५), फ्रान्स (२००१ आणि २००३) आणि स्पेन (२०१३) यांनी जेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला होता.
०१ : जर्मनीविरुद्धच्या गेल्या ११ सामन्यांत मेक्सिकोला (५ अनिर्णीत व ५ पराभूत) केवळ एकच विजय मिळवता आला आहे. १९८५च्या मैत्रीपूर्ण लढतीत मेक्सिकोने २-० असा विजय मिळवला होता.
०५ : महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांत जर्मनीने मेक्सिकोला पाच वेळा पराभूत केले आहे. यातील तीन पराभव हे विश्वचषक स्पध्रेमधील, तर दोन कॉन्फेडरेशन चषक स्पध्रेमधील आहेत.
आम्ही ठरवल्याप्रमाणे सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. वर्चस्व गाजवत सामन्यावर पकड निर्माण केली. दुसऱ्या टप्प्यात मेक्सिकोने आम्हाला चोख प्रत्युत्तर दिले आणि ते आम्हाला अपेक्षित होतेच. अंतिम फेरीतही हा युवा संघ अशीच कामगिरी करेल आणि चिलीला पराभूत करून जेतेपद पटकावेल.
– जोकीम लो, जर्मनी संघाचे प्रशिक्षक