एपी, टोरंटो : पूर्वार्धात नाकारण्यात आलेल्या दोन गोलनंतरही उत्तरार्धात बदली खेळाडू म्हणून आलेल्या डेनिझ उंडावच्या दोन गोलच्या जोरावर जर्मनीने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आयव्हरी कोस्टचा २-१ असा पराभव करून बाद फेरीत प्रवेश केला.

या कामगिरीने चार वेळा विजेत्या असलेल्या जर्मनीने २०१८ आणि २०२२ मधील साखळीतून बाहेर पडण्याचे अपयश धुऊन काढले. यापूर्वी २०१४ मध्ये जर्मनीने साखळी फेरीचा अडथळा पार केला तेव्हा अखेरचे विजेतेपद मिळविले होते. सामन्याच्या ३०व्या मिनिटाला आयव्हरी कोस्टचा कर्णधार फ्रँक केसी याने गोल करत संघाचे खाते उघडले.

मध्यरक्षक यान दिओमांडने दिलेल्या क्रॉसवर अमद दियालो याने मारलेली किक जर्मनीच्या नॅथॅनियल ब्राउनने अडवली. मात्र, चेंडू उसळी घेऊन केसीच्या पुढ्यात पडला आणि त्याने समयसूचकता दाखवत त्याला थेट गोलजाळीची दिशा दिली. खेळाच्या सुरुवातीपासून दोन्ही संघातील खेळाडूंची  चेंडूवर ताबा मिळविण्यासाठी कमालीची चुरस दिसून आली. बलाढ्य जर्मनीच्या आक्रमणाला आयव्हरी कोस्टने तेवढ्याच तीव्रतेने अचूक उत्तर दिले.

जर्मनीचा हिरमो़ड

जर्मनीने आपल्या खेळातील आक्रमकता कायम राखली. त्यांच्या खेळात वेग असला, तरी आयव्हरी कोस्टचा बचाव भेदणे त्यांना तेवढे सहज जात नव्हते. अशा कठीण प्रसंगातूनही मार्ग शोधत जर्मनीने पूर्वार्धात दोन गोल केले. मात्र, ते नाकारण्यात आल्याने त्यांचा हिरमोड झाला. वर्चस्व मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या जर्मनीसाठी हा धक्का होता. प्रथम २१व्या मिनिटाला आयव्हरी कोस्टचा गोलरक्षक फोफानाने चेंडू स्वत:च्याच गोलजाळीत ढकलला. पण, त्या वेळी जर्मनीचा मध्यरक्षक ॲलेक्झांडर पाव्हलोविचकडून चुकीच्या पद्धतीने फोफानाशी संपर्कात आल्याचे आढळल्याने पंचांनी गोल नाकारला. त्यानंतर ३८व्या मिनिटाला काय हावेट्झने गोल केला, तेव्हा जमाल मुसियालाचा हा प्रयत्न फाऊल धरण्यात आला.

चर्चा वाहीच्या न्यायालयीन लढाईची

आयव्हरी कोस्टचा प्रमुख आक्रमक खेळाडू एली वाही या सामन्यात खेळू शकला नाही. त्याला कॅनडात प्रवेश नाकारण्यात आला होता. फ्रान्समधील नीस क्लबकडून खेळताना एका बेटिंग घोटाळ्यात त्याचे नाव आले होते. त्यामुळे त्याला कॅनडात प्रवेश नव्हता. यासाठी मोठी न्यायालयीन लढाई वाहीला लढावी लागली. न्यायालयातून मान्यता मिळाल्यानंतर तो संघात दाखल झाला खरा, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.

निर्णायक बदल

उत्तरार्धात जर्मनीने केलेले बदल निर्णायक ठरले. डेनिझ उंडाव आणि नदीम अमिरी या दोघांनी जर्मनीने एकाच वेळी मैदानात उतरवले. त्यानंतर आठ मिनिटांनी या जोडीने जर्मनीला प्रथम बरोबरी साधून दिली. सामन्याच्या ६८व्या मिनिटाला अमिरीने दिलेला लांब पास आक्रमक खेळाडू हावेट्झने कल्पकता दाखवून पुढे जाऊ दिला आणि चेंडू मुसंडी मारलेल्या उंडावच्या पायाशीच आला. त्याने ही संधी अचूक साधत आयव्हरी कोस्टच्या गोलरक्षक फोफानाला चकवले. हा गोल जर्मनीसाठी प्रेरक ठरला. त्यानंतर जर्मनीच्या आक्रमणातील धार वाढली आणि भरपाई वेळेत फेलिक्स एन्मेच्याकडून आलेल्या क्रॉसवर उंडावने अगदी समोरून दुसर्‍यांदा गोलरक्षक फोफानाला चकवले आणि जर्मनीचा विजय साकार केला.