गुजरात जायंट्सने वुमन्स प्रीमियर लीग २०२६ प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. स्पर्धेच्या इतिहासात गुजरात जायंट्सने मुंबई इंडियन्स संघावर पहिला विजय मिळवला आहे. गुजरातने अवघ्या ११ धावांनी मुंबईवर विजय मिळवत प्लेऑफ गाठली आहे. हरमनप्रीत कौरने ८२ धावांची वादळी खेळी करत सर्वांची मनं जिंकली पण संघाला विजय मिळवून देण्यात ती अपयशी ठरली.

हरमनप्रीत कौरने मुंबईचा डाव उचलून धरला होता. अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी २६ धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर हरमनने षटकार लगावला. दुसरा डॉट बॉल ठरला. तर तिसऱ्या चेंडूवरही हरमनने षटकार खेचला. पण पुढच्या चेंडूंमध्ये मात्र गार्डनरने बाजी मारत मुंबईला पुनम खेमनारच्या रूपात धक्का दिला आणि हरमनला स्ट्राईक न मिळाल्याने मुंबईने सामना गमावला. हरमनने या सामन्यात ४८ चेंडूत ८ चौकार व ४ षटकारांसह ८२ धावांची खेळी केली.

गुजरातने मुंबईला विजयासाठी १६८ धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईची पुन्हा एकदा सुरूवात खराब झाली. सजना सजीवन २६ धावा करत बाद झाली. तर हिली मॅथ्यूज ६ धावा करत बाद झाली. याशिवाय नॅट स्किव्हर २ धावांवर बाद झाल्याने मुंबईला मोठा धक्का बसला. सजना सजीवनला खालच्या फळीत फलंदाजीला न ठेवता सलामीला उतरवणं हा संघाचा निर्णय संघाला फटका देणारा ठरला. अमेलिया करने मधल्या षटकांमध्ये १६ चेंडूत २० धावा करत साथ दिली. तर अमनजोत कौर १३ धावा करत बाद झाली. तर हरमन अखेरच्या षटकापर्यंत लढली पण मुंबईने मात्र सामना गमावला.

गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातची सुरूवातही फारशी चांगली झाली नाही. बेथ मुनी ५ धावा करत बाद झाली. तर सोफी डिव्हाईन २५ धावांवर बाद झाली. तर अनुष्का शर्माने ३३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पण यानंतर अॅश्ले गार्डनरने २८ चेंडूत ७ चौकार व एका षटकारासह ४६ धावा केल्या. २६ चेंडूत ४ चौकार व दोन षटकारांसह ४४ धावांची खेळी केली आणि यासह संघाला ४ बाद १६७ धावांपर्यंत नेलं. अखेरच्या षटकांमध्ये गार्डनर व वेयरहम यांनी ४३ चेंडूत ७१ धावांची भागीदारी रचली.

मुंबई इंडियन्स प्लेऑफ कशी गाठणार

गुजरात जायंट्स आणि आरसीबीने प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे, त्यामुळे फक्त एकच स्थान शिल्लक आहे. मुंबई, दिल्ली आणि युपी वॉरियर्ज हे देखील या स्थानासाठी दावेदार आहेत. पण, लीग टप्प्यात फक्त एकच सामना शिल्लक आहे, जो दिल्ली आणि युपी वॉरियर्ज यांच्यात खेळला जाईल. जर दिल्लीने हा सामना जिंकला तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरतील. पण, जर वॉरियर्जने मोठ्या फरकाने विजय मिळवला तर ते त्यांचे स्थान निश्चित होईल. शिवाय, जर युपीने कमी फरकाने सामना जिंकला तर मुंबई नेट रन रेटच्या आधारे पात्र ठरेल.