नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील चमकदार कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून झालेल्या सन्मानाने भारतीय खेळाडू भारावून गेले. पंतप्रधानांच्या भेटीमुळे आणि त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आमचा आत्मविश्वास वाढल्याची भावना खेळाडूंनी व्यक्त केली. पंतप्रधानांनी शनिवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचा गौरव केला होता. त्यानंतर खेळाडूंनी पंतप्रधानांना काही भेटवस्तूही दिल्या.

‘‘भारताच्या सर्व बॉक्सिंगपटूंची स्वाक्षरी असलेले बॉक्सिंग ग्लोव्ह्ज पंतप्रधान मोदी यांना देणे, ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. पंतप्रधानांनी खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेतल्याचा आनंद आहे,’’ असे राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती बॉिक्सगपटू निकहत झरीन म्हणाली. ‘‘पंतप्रधान मोदी यांच्याकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे आत्मविश्वास उंचावला आहे. त्यांना भेटवस्तू देण्याचा मान मिळाला हेदेखील माझ्यासाठी विशेष आहे. सर्व आसामवासीयांच्या वतीने शुभेच्छा म्हणून येथील पारंपरिक वस्त्र ‘गमचा’ मी त्यांना भेट दिला,’’ असे भारताची धावपटू हिमा दासने आपल्या ‘ट्विटर’वरील खात्यावर लिहिले.