प्रशांत केणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘मुली या खेळात का सहभागी झाल्या नाहीत? बॉक्सिंग हा खेळ फक्त पुरुषांचाच आहे का?’’ ग्रामीण क्रीडा स्पर्धा पाहताना आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या निकहत झरीनने कुतूहलाने वडिलांना प्रश्न विचारला. ‘‘बॉक्सिंग खेळ कुणीही खेळू शकतो. फक्त मानसिक आणि शारीरिक सामर्थ्यांची आवश्यकता असते. पण मुलींमध्ये बॉक्सिंग खेळण्याची क्षमता नसते असे लोकांना वाटते,’’ असे व्यावसायिक क्रिकेट आणि फुटबॉल खेळलेल्या वडील मोहम्मद जमील अहमद यांनी तिला समजावतानाच आव्हानही दिले. डोळय़ांत अंगार संचारल्याप्रमाणे ‘‘मैं बॉक्सिंग खेलूंगी!’’ असे निकहतने आत्मविश्वासाने वडिलांना सांगितले.

बॉक्सिंग खेळाने भारावण्याआधी निकहत अ‍ॅथलेटिक्सचे प्रशिक्षण घ्यायची. १०० मीटर, २०० मीटर जिल्हास्तरीय शर्यतींमध्ये तिने पदकेही जिंकली आहेत. पाहता-पाहता निकहतचे बॉक्सिंग प्रशिक्षण सुरू झाले. तेलंगणमधील मुस्लीम मोहल्ल्यात राहणाऱ्या निकहतचे सरावाचे तोकडी विजार आणि बिनबाह्याची जर्सी हे कपडे लोकांना रुचले नाहीत. त्यामुळे तिला आणि तिच्या पालकांना टीका-टोमण्यांचा भडिमार सहन करावा  लागला. कुणी कपडय़ांवरून, तर कुणी शरीरसंपदेवरून टिपण्णी करायचे. याचप्रमाणे मार लागला, तर लग्न कोण करणार. आयुष्य बरबाद होईल, असा सल्ला काही जण द्यायचे. पण जमील कुटुंबाचा निर्धार पक्का होता.

निकहतने बॉक्सिंग प्रशिक्षणाला प्रारंभ केला, तेव्हा एकही मुलगी तिच्यासोबत नव्हती. त्यामुळे मुलांसोबत ती सराव करायची. सुरुवातीला प्रतिस्पध्र्याकडून अनेकदा तिने मार खाल्ला. परंतु कालांतराने आत्मविश्वास वाढल्यामुळे त्याच मुलांना तिने धूळ चारली. मग निकहतला वडिलांनी विशाखापट्टणम येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात दाखल केले. तिथे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक आयव्ही राव यांच्या मार्गदर्शनाखाली तिने खेळातील उत्तम कौशल्ये आत्मसात केली. मग तिने उपकनिष्ठ गटातील राष्ट्रीय जेतेपद पटकावून सर्वाचे लक्ष वेधले. वर्षभरात ती कनिष्ठ गटातील जगज्जेती झाली. तिची यशोभरारी इतक्यावरच थांबली नाही, तर गुरुवारी तिने वरिष्ठ गटाच्या  जगज्जेतेपदाला गवसणी घातली. परिणामी टीकाकारांचे मतपरिवर्तन झाले आणि तिच्याकडे आता ते अभिमानाने पाहू लागले आहेत.

मुलीमधील क्रीडात्मक गुणवत्ता हेरणाऱ्या आणि तिची जोपासना करणाऱ्या निकहतच्या वडिलांना या  यशाचे श्रेय जाते. जिंकणे आणि शिकणे, हा दृष्टिकोन बॉक्सिंगने निकहतच्या आयुष्याला दिला. २०१७मध्ये झालेल्या दुखापतीतून सावरत पुन्हा रिंगणात परतणे, हे सोपे नव्हते. या दुखापतीमुळे २०१८मधील आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा तसेच जागतिक स्पर्धाची तिची संधी  हुकली. पण दुखापतीतून सावरत ती पुन्हा रिंगणात आली. आता बॉक्सिंगमधील जगज्जेतेपद जिंकणारी पाचवी भारतीय महिला ठरणाऱ्या निकहतला ऑलिम्पिक सुवर्णपदक साद घालत आहे.

२०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये एमसी मेरी कोमने जिंकलेले कांस्यपदक हे महिला बॉक्सिंगसाठी क्रांतिकारक ठरले. मेरीच्याच प्रेरणेने अनेक जणी या खेळाकडे  आकर्षित झाल्या. परंतु मेरीचे हुकलेले ऑलिम्पिक सुवर्णपदक निकहत जिंकेल, हे स्वप्न जमील यांनी बाळगले आहे. महिलांच्या ५२ किलो वजनी गटात मेरीची २००१पासून मक्तेदारी आहे. या गटात स्वत:ला सिद्ध करणे निकहतसाठी मुळीच सोपे नव्हते. मार्चमध्ये स्ट्रँडजा बॉक्सिंग स्पर्धेत निकहतने ऑलिम्पिक रौप्यपदक विजेतीला अस्मान दाखवत सुवर्णपदक पटकावले आणि तुर्कीतील हे विश्वविजेतेपद तिच्या वर्चस्वाची ग्वाही देते.

टोक्यो ऑलिम्पिकसाठी मेरीचे नाव थेट पक्के करणाऱ्या भारतीय बॉक्सिंग संघटनेच्या निर्णयाला आक्षेप घेण्याचे धारिष्टय़ निकहतने दाखवले. इतकेच नव्हे, तर क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना पत्र लिहून ऑलिम्पिकसाठी निवड चाचणी घेण्यासाठी लढा दिला. तो चालू  असताना एका मुलाखतीत मेरीने ‘‘कोण निकहत? मला माहीत नाही!’’ असा आपला संताप प्रकट केला होता. निकहतला न्याय मिळाला. पण मेरीविरुद्धची निवड चाचणीची लढत तिने गमावली. महिला बॉक्सिंगसाठी प्रेरणादायी मानल्या जाणाऱ्या मेरीने निकहतला हस्तांदोलन करण्याचेही टाळले आणि या अनोळखी प्रतिस्पध्र्याविरुद्ध विजयाचा नाचून जल्लोष साजरा केला. स्वाभाविकपणे स्वत:च्या न्याय्यहक्कासाठी लढणारी निकहत खलनायिका ठरली. समाजमाध्यमांवर तिला दूषणे दिली जाऊ लागली. पण ती खचली नाही. आता विश्वविजेतेपद जिंकल्यानंतर समाज मानसिकता बदलली आहे. आता ती देशवासीयांची नवनायिका झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती आनंद मिहद्रा यांच्यासह मान्यवरांनी तिच्या पराक्रमाची प्रशंसा केली आहे. समाजमाध्यमांवरही ती आघाडीवर आहे. यात कौतुककर्त्यांमध्ये मेरीचा समावेश नाही. पण मेरी सध्या ३९ वर्षांची झाली आहे. त्यामुळे २०२४मध्ये पॅरिसला होणाऱ्या आगामी ऑलिम्पिकसाठी निकहतच्या मार्गात मेरी नसेल.

prashant.keni@expressindia.com

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girls in sports participants boxing sports competition nikhat zareen mental physical strengths ysh
First published on: 22-05-2022 at 01:03 IST