गेल्यावर्षी अर्धवट सोडलेला इंग्लंड दौरा पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये गेलेला आहे. दोन्ही संघादरम्यान १ ते ५ जुलै दरम्यान पाच सामन्यांच्या मालिकेतील पाचवा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. त्या सामन्यापूर्वीच भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे पाचव्या कसोटीमध्ये त्याच्या खेळण्याबाबत अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीमध्ये ऋषभ पंत किंवा जसप्रित बुमराहकडे संघाचे नेतृत्व असण्याची शक्यता आहे. मात्र, रोहितच्या अनुपस्थितीमध्ये विराट कोहली हाच सर्वोत्कृष्ट पर्याय असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर विराट कोहली कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला होता. यानंतर रोहित शर्माच्या हाती संघाचे कर्णधारपद आले. त्यानुसार इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत रोहित शर्मा कर्णधारपद भूषवणार होता. मात्र, लिसेस्टरशायर विरुद्ध सुरू असलेल्या सराव सामन्यादरम्यान त्याची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने मुख्य सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. अशा वेळी विराट कोहलीला कर्णधार करावी अशी जोरदार मागणी त्याचे चाहते करत आहेत.

गेल्यावर्षी जेव्हा भारत इंग्लंड दौऱ्यावर गेला होता तेव्हा विराट कोहली कर्णधार होता. आता तिच मालिका पूर्ण करण्यासाठी संघ गेला आहे, तर विराटलाच कर्णधाराची जबाबदारी द्यावी, असेही त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, संघ व्यवस्थापनाने विराटला कर्णधार करण्याचा विचार केला तरी विराट ही जबाबदारी घेणार नाही, अशी दाट शक्यता आहे. कारण, यापूर्वी २५ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या श्रीलंका कसोटीतही विराटला कर्णधारपद देऊ केले होते. ही त्याच्या कारकिर्दीतील १००वी कसोटी होती. त्या कसोटीत त्याला कर्णधार होण्याचा मान मिळवता आला असता पण, त्याने तेव्हाही नकार दिला होता. त्यामुळे जर रोहित शर्मा सामन्यापर्यंत बरा झाला नाही तर ऋषभ पंत किंवा जसप्रीत बुमराह यांच्यापैकी एकाला संघाचे नेतृत्व करावे लागेल.