Glenn Maxwell 5 Records: ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने वयाच्या ३८ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाला अनेक महत्वाचे सामने जिंकून देणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलने २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आता १४ वर्षांनंतर त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे. या १४ वर्षांच्या कारकिर्दीत त्याला ऑस्ट्रेलियासाठी १४९ वनडे, १३९ टी-२० सामने आणि ७ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ५ मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत.
५० पेक्षा अधिक डावात सर्वोत्तम स्ट्राईक रेटने फलंदाजी करणारा फलंदाज
ग्लेन मॅक्सवेलला वनडे क्रिकेटमध्ये १३६ वेळा फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने १२६.७ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. ज्या फलंदाजांनी ५० हून अधिक डावात फलंदाजी केली आहे. त्यामध्ये ग्लेन मॅक्सवेलचा स्ट्राईक रेट हा सर्वोत्तम आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड
यासह टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ग्लेन मॅक्सवेल हा संयुक्तरित्या अव्वल स्थानी आहे. मॅक्सवेलच्या नावे एकूण ५ शतकं झळकावण्याचा रेकॉर्ड आहे. तसेच भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माच्या नावे देखीस टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५ शतकं झळकावण्याची नोंद आहे.
वनडे क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी करणारा पहिला नॉन ओपनर
ऑस्ट्रेलियाने २०२३ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाचा मान पटकावला होता. या विजयात ग्लेन मॅक्सवेलचा सर्वात मोलाचा वाटा आहे. कारण या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ हवी तशी कागमिरी करू शकला नव्हता. त्यावेळी अफगाणिस्तानविरुद्धचा सामना ऑस्ट्रेलियासाठी अतिशय महत्वाचा होता. या सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा संघ पराभवाच्या उंबरठ्यावर उभा होता. सामना हातून निसटलेला असतानाही ग्लेन मॅक्सवेलने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन नाबाद २०१ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर त्याने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. यासह तो वनडे क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी करणारा पहिलाच नॉन ओपनर फलंदाज ठरला होता.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वात वेगवान शतक
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा रेकॉर्ड हा ग्लेन मॅक्सवेलच्या नावे आहे. २०२३ मध्ये नेदरलँड्स संघाविरुद्ध खेळताना त्याने अवघ्या ४० चेंडूंमध्ये शतक झळकावलं होतं. हे वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतकं ठरलं.
आठव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा रेकॉर्ड
वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना आठव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा रेकॉर्ड हा ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर आहे. २०२३ वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध फलंदाजी करताना पॅट कमिन्स आणि ग्लेन मॅक्सवेल या जोडीने आठव्या विकेटसाठी २०२ धावांची विक्रमी भागीदारी केली होती.
