Australia T20 WC 2026 Exit: टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ साठी संघ ठरले, पण यामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ मात्र नसणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाला स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून बाहेर पडावं लागलं आहे. मिशेल मार्शच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाचा संघ त्यांच्या अखेरच्या गट फेरीच्या सामन्यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडला आणि सुपर ८ मध्ये पात्रता मिळवण्यात अपयशी ठरला. संघाच्या खराब कामगिरीनंतर माजी दिग्गज खेळाडू ग्लेन मॅकग्राने मोठं वक्तव्य केलं.

ऑस्ट्रेलिया संघाला टी-२० विश्वचषक गट टप्प्यात झिम्बाब्वे व श्रीलंका या संघांनी पराभूत केलं. ऑस्ट्रेलिया संघ या पराभवांमधून सावरू शकला नाही आणि अखेरीस स्पर्धेबाहेर व्हावं लागलं. आता, ऑस्ट्रेलिया बाहेर पडल्याने, टीकेची लाट देखील पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये त्यांचे अनेक माजी खेळाडू निवडीबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत.

“या वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच आम्ही ऑस्ट्रेलियाबाबत चिंता व्यक्त केली होती. जेव्हा प्रतिस्पर्धी संघ खेळताना तेव्हा ऑस्ट्रेलियन संघाचा तो दबदबा ती दहशत आता दिसत नाही, दुर्दैवाने हे आश्चर्यकारक नाही,” असे ग्लेन मॅकग्रा यांनी माजी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी व डॅमन फ्लेमिंग यांच्या पॉडकास्टमध्ये म्हटलं.

निवड समितीने टी-२० वर्ल्डकपपूर्वी उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या कसोटीतील दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथला सुरुवातीला संघात स्थान न देण्याचा निर्णय हा टीकेचा प्रमुख मुद्दा ठरला. बिग बॅश लीगमध्ये दमदार कामगिरी असूनही स्मिथला वगळण्यात आलं. त्याला उशिरा संघात बोलावण्यात आलं, तेव्हा ऑस्ट्रेलियासाठी उशीर झाला होता.

विशेष म्हणजे कॅमेरून ग्रीनला स्मिथच्या आधी संधी देण्यात आली, याबाबत मॅकग्रा यांनी आश्चर्य व्यक्त केलं. “जर कॅमेरॉन ग्रीन गोलंदाजी करत नसेल, तर निवडकर्ते असे म्हणत आहेत का की तो स्टीव्ह स्मिथपेक्षा चांगला खेळाडू आहे? तो गोलंदाजी करत नसेल, तर त्याचे संघातील स्थान कशावर आधारित आहे, हे मला समजत नाही,” असे मॅकग्रा यांनी स्पष्टपणे सांगितले.

जेसन गिलेस्पी यांनी ग्रीन-कॉनोलीला सुनावलं

मिचेल मार्श दुखापतीमुळे स्पर्धेतील पहिले दोन सामने खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत ट्रॅव्हिस हेडने आयर्लंड आणि झिम्बाब्वेविरुद्ध संघाचं नेतृत्व केलं. सध्या या टी-२० वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या मॅट रेनशॉने झिम्बाब्वेविरुद्ध ६५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. मात्र श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी त्याला संघातून वगळण्यात आलं. या निर्णयावर जेसन गिलेस्पी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “हा निर्णय अक्षरशः डोकं फिरवणारा होता…, याला अजिबात अर्थ नव्हता,” असे गिलेस्पी यांनी पॉडकास्टमध्ये म्हटले.

गिलेस्पी यांनी अष्टपैलू कुपर कॉनोली आणि कॅमेरॉन ग्रीन यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “कधीतरी निवडकर्त्यांनी दाखवलेल्या विश्वासाची परतफेड करावीच लागते,” असं ते म्हणाले. “कूपर कॉनॉली आणि काही प्रमाणात कॅमेरॉन ग्रीन हे दोघेही त्यांच्यावर दाखवलेल्या पूर्ण विश्वासाला न्याय देताना दिसत नाहीत. एखाद्या टप्प्यावर निवडकर्त्यांनी दाखवलेल्या विश्वासाची परतफेड करावीच लागते. पण आत्ता तरी कूपर कोनॉली आणि थोड्याफार प्रमाणात कॅमेरॉन ग्रीन, त्यांना दिलेल्या संपूर्ण पाठिंब्याला साजेशी कामगिरी करताना दिसत नाहीत,” असं जेसन गिलेस्पी म्हणाले.