CPL 2026 Glenn Phillips Catch Video: ग्लेन फिलिप्स आपल्या मैदानावरील कमाल क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो, त्याने पुन्हा एकदा याची झलक दाखवून दिली. फिलिप्स सध्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे, तिथेच त्याने सीमारेषेजवळ एक आश्चर्यचकित करणारा झेल टिपला आणि हा झेल पाहून तो स्वत:ही स्तब्ध झाला. याशिवाय मैदानाबाहेर बसलेल्या मुलानेही डोक्याला हात लावत आश्चर्यचकित केलं.
कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये ट्रिनबागो नाइट रायडर्स आणि गयाना अॅमेझॉन वॉरियर्स यांच्यातील सामन्यात फिलिप्सने एका हाताने घेतलेला अप्रतिम झेल टिपत सर्वांनाच थक्क केलं. ट्रिनबागो संघाच्या सुधारित लक्ष्याचा पाठलाग करताना हा शानदार झेल पाहायला मिळाला. पावसामुळे व्यत्यय आलेल्या या रंगतदार सामन्यात फिलिप्सच्या या अफलातून क्षेत्ररक्षणाने सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं.
सुनील नरेन फलंदाजीसाठी मैदानात आला आणि फिलिप्सच्या कॅचमुळे तो दोन चेंडूत झेलबाद झाला. ड्वेन प्रिटोरियसने ट्रिनबागो संघाला मोठा धक्का देत गयानासाठी महत्त्वाची संधी निर्माण केली. उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने शॉर्ट चेंडू टाकला. नरेनने लेग साइडच्या दिशेने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॅटला लागून चेंडू वेगाने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने उडाला. तिथे ग्लेन फिलिप्स क्षेत्ररक्षण करत होता.
चेंडूचा अंदाज घेत फिलिप्सने क्षणाचाही विलंब न करता उजवीकडे धाव घेतली. मात्र, पूर्ण वेगाने धावत असताना काही क्षणांसाठी त्याचा चेंडूवरचा ताबा सुटल्याचं दिसलं. तरीही त्याने लगेच परिस्थिती सावरली, आपल्या हालचालींमध्ये योग्य तो बदल केला आणि अगदी योग्य क्षणी स्वतःचा वेग कमी केला. चेंडू वेगाने खाली येत असताना फिलिप्सने उजवा हात पुढे केला आणि चेंडू त्याच्या हवेतच त्याच्या हातात जाऊन बसला.’
फिलिप्सचा हा झेल इतका अनपेक्षित होता की स्वतः फिलिप्सलाही आपण हे कसं केलं यावर विश्वास बसत नव्हता. झेल घेतल्यानंतर तो मिश्कीलपणे हसला आणि काही क्षण अविश्वासाने तिथेच उभा राहिला. नरेनला अवघ्या दोन चेंडूंत एका धावेवर माघारी परतावं लागलं. त्यामुळे ट्रिनबागो संघाच्या अडचणी आणखी वाढल्या.
अॅलेक्स हेल्स व निकोलस पुरन यांनी ट्रिनबागो संघासाठी शानदार खेळी केल्या, पण संघाला विजय मिळवून देण्यात मात्र ते अपयशी ठरले. गयाना संघाकडून नाबाद १११ धावांची शतकी खेळी करणारा शिमरॉन हेटमायर संघाच्या विजयाचा हिरो ठरला.
