Glenn Phillips Record: वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आला होता, त्यावेळी शे होप हा एकमेव फलंदाज होता जो पहिल्या सामन्यापासून ते शेवटच्या सामन्यापर्यंत भारतीय गोलंदाजांवर भारी पडला होता. आता भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत ग्लेन फिलिप्स नावाचं वादळ पाहायला मिळालं. या संपूर्ण मालिकेत ग्लेन फिलिप्सने एकूण ३४१ धावा केल्या. यासह त्याने इंग्लंडचा स्फोटक फलंदाज फिल सॉल्टचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
मालिकेतील पहिल्या सामन्यापासून ग्लेन फिलिप्सची बॅट चांगलीच तळपली. या मालिकेत त्याने ३४१ धावा केल्या. यासह त्याने टी-२० क्रिकेटच्या इतिहासात एकाच द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. याआधी हा रेकॉर्ड फिल सॉल्टच्या नावावर होता. सॉल्टने २०२३ मध्ये फलंदाजी करताना वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत ३३१ धावा केल्या होत्या. तर पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवानने २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना ३१६ धावा केल्या होत्या. आता भारतीय संघाविरुद्ध खेळताना ग्लेन फिलिप्सने धावांचा पाऊस पाडून हा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
एकाच टी-२० आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
ग्लेन फिलिप्स विरूद्ध भारत- ३४१ धावा (२०२६)
फिल सॉल्ट विरुद्ध वेस्ट इंडिज- ३३१ धावा (२०२३)
मोहम्मद रिझवान विरुद्ध इंग्लंड- ३१६ धावा (२०२२)
न्यूझीलंडला हा सामना जिंकण्यासाठी १९२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला होता. फिन अॅलेन स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर टीम सेफर्ट आणि डॅरील मिचेलने मिळून न्यूझीलंडचा डाव सावरला. मिचेलने २९ धावा केल्या. तर शेवटी टीम सेफर्ट आणि ग्लेन फिलिप्सने धावांचा पाऊस पाडला. सेफर्टने ५० चेंडूंमध्ये ९३ धावांची खेळी केली. तर ग्लेन फिलिप्सने ३८ चेंडूंमध्ये नाबाद ६५ धावांची खेळी करून आपल्या संघाला ७ गडी राखून विजय मिळवून दिला.
