Glenn Phillips: आयपीएल २०२६ स्पर्धेतील १४ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. गुजरातने २० षटकांअखेर ४ गडी बाद २१० धावा केल्या होत्या. यादरम्यान शुभमन गिलने सर्वाधिक ७० धावांची खेळी केली. तर जोस बटलरने ५२ आणि वॉशिंग्टन सुंदरने ५५ धावांची खेळी केली. शेवटी ग्लेन फिलिप्सने नाबाद १४ धावा केल्या. तो आपल्या फलंदाजीमुळे नव्हे, तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

फलंदाज आहे की उसेन बोल्ट?

ग्लेन फिलिप्स आपल्या अष्टपैलू कामगिरीमुळे नेहमीच चर्चेत असतो. फलंदाजी करताना तो डाव्या आणि उजव्या हाताने फलंदाजी करू शकतो. फिरकी गोलंदाजी करू शकतो. यष्टिरक्षण करू शकतो आणि क्षेत्ररक्षण करताना लांब लांब डाईव्ह मारून झेल टिपू शकतो. दरम्यान फलंदाजी करताना त्याची धाव घेण्याची शैली जरा वेगळीच आहे. तो बॅट सोडून देतो आणि उसेन बोल्टसारखा धावत सुटतो. असाच काहीसा प्रकार या सामन्यातही पाहायला मिळाला.

तर झाले असे की, गुजरात टायटन्स संघाची पहिल्या डावातील फलंदाजी सुरू असताना ग्लेन फिलिप्स आणि वॉशिंग्टन सुंदर मैदानावर होते. तर १९ वे षटक टाकण्यासाठी नटराजन गोलंदाजीला आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर ग्लेन फिलिप्सने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत गेला, त्यावेळी फिलिप्सला असं वाटलं की झेल टिपला गेला आहे. त्यामुळे त्याने बॅट सोडून दिली. पण चेंडू क्षेत्ररक्षकापासून दूर राहिला. त्यामुळे त्याला जीवदान मिळालं. त्यावेळी फिलिप्सने बॅट फेकली आणि उसेन बोल्ट स्टाईल स्प्रिंट केली आणि एक धाव पूर्ण केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या गुजरात टायटन्स संघाने ४ गडी बाद २१० धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुलने ९२ धावांची खेळी केली. तर पथूम निसांकाने ४१ धावांची खेळी केली. शेवटी डेव्हिड मिलर ४१ धावांवर नाबाद राहिला. शेवटच्या २ चेंडूवर दिल्लीला विजयासाठी दोन धावा करायच्या होत्या. पण पाचव्या चेंडूवर मिलरने १ धाव घेण्यास नकार दिला आणि शेवटचा चेंडू निर्धाव राहिला. त्यामुळे गुजरातने हा सामना एका धावेने खिशात घातला.