मामाया (रोमानिया) : भारताच्या प्रणव आनंद आणि ए. आर. इलामपार्थी यांनी शुक्रवारी जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या खुल्या गटातील अनुक्रमे १६ आणि १४ वर्षांखालील गटांचे विजेतेपद पटकावले.

अग्रमानांकित आनंदने ११ डावांमध्ये एकूण नऊ गुणांची कमाई करताना अर्ध्या गुणाच्या फरकाने बाजी मारली. आनंद संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला. त्याने सात सामन्यांत विजय मिळवले, तर चार सामने बरोबरीत सोडवले. आनंदने १०व्या डावात अर्मेनियाच्या ईमिन आहोनयाला हरवले, तर अखेरच्या डावात फ्रान्सच्या ड्रोइन ऑगस्टिनशी बरोबरी साधली. द्वितीय मानांकित एम. प्रणेशने एकूण आठ गुणांसह अन्य तिघांच्या साथीने संयुक्तपणे तिसरे स्थान मिळवले.

इलामपार्थीने ११ डावांमध्ये एकूण ९.५ गुण प्राप्त केले. त्यानेही अर्ध्या गुणाच्या फरकाने सरशी साधली. इलामपार्थीने चौथ्या डावात युक्रेनच्या आर्टीम बेरिनकडून पराभव पत्करला. पण याव्यतिरिक्त नऊ सामन्यांत विजय मिळवले, तर एक बरोबरीत सोडवला. १८ वर्षांखालील गटात सोहम कामोत्राने एकूण सात गुणांसह १४वे स्थान मिळवले, तर एस.  हर्षदला (६.५ गुण) २४वे स्थान मिळाले.