scorecardresearch

Premium

स्वअस्तित्व उंच करण्याची आस!

अनेक खेळाडू आपल्या प्रारंभीच्या काळात एक आदर्श समोर ठेवून त्याच्या पावलावर पाऊल टाकून कारकीर्द घडवतात. मात्र, सध्याची पिढी ही थोडी निराळीच आहे.

स्वअस्तित्व उंच करण्याची आस!

अनेक खेळाडू आपल्या प्रारंभीच्या काळात एक आदर्श समोर ठेवून त्याच्या पावलावर पाऊल टाकून कारकीर्द घडवतात. मात्र, सध्याची पिढी ही थोडी निराळीच आहे. कुणाला आदर्श मानण्यापेक्षा आपण इतरांसाठी आदर्श बनावे, असा त्यांचा अट्टहास. एखाद्याला आदर्श मानून वाटचाल केल्यास त्या खेळाडूची छाप आपल्यावर पडते. त्याचे प्रतिबिंब म्हणूनही आपल्याकडे पाहिले जाते. असे प्रतिबिंबात्मक आयुष्य जगण्यापेक्षा स्वत:चे अस्तित्व उंच करावे, की सर्व आपल्याला आदर्श मानतील. नाशिकची १६ वर्षीय दुर्गा देवरेसुद्धा याच निर्धाराने झपाटलेली आहे.
‘‘कोणाचाही आदर्श डोळ्यांसमोर नाही. माझ्यासाठी मीच आदर्श आहे आणि त्यातूनच सर्वोत्तम कामगिरी करण्याचे बळ मिळते. आदर्श म्हणून कुणाचे अनुकरण करण्यापेक्षा, जगासमोर स्वत:चा आदर्श ठेवायला आवडेल,’’ असे स्पष्ट  मत जागतिक शालेय अ‍ॅथलेटिक स्पध्रेत १५०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकलेल्या दुर्गाने व्यक्त केले.
चीनमध्ये झालेल्या या स्पध्रेत दुर्गाने स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडला आणि भारताच्या खात्यात सुवर्णपदकाची भर टाकली. दोहा येथे पहिल्याच आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर गेलेल्या दुर्गाला दुखापतीने घेरले आणि तिला आशियाई युवा अ‍ॅथलेटिक स्पध्रेत अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही. याची खंत मनाशी बाळगून दुर्गा नव्या जिद्दीने उभी राहिली आणि जागतिक शालेय अ‍ॅथलेटिक स्पध्रेसाठी तिने सराव केला.
‘‘दोहा येथील आशियाई युवा स्पध्रेत आजारपणामुळे अपयश आले होते. त्याची खंत होती, परंतु चीनमध्ये मिळालेल्या संधीतून ती खंत दूर करायची हा निर्धार मनाशी पक्का केला होता. कोणत्याही स्पध्रेत सहभागी होण्यासाठी शारीरिक तयारीबरोबर मानसिक तयारीही गरजेची असते आणि मी संपूर्ण तयारीनिशी या स्पध्रेत उतरली होती. त्याचे चीज झाले आणि सुवर्णपदक जिंकले,’’ अशी प्रतिक्रिया दुर्गाने दिली.
या खेळात प्रगती करून आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंगा डौलाने फडकवायचा, असे इतर खेळाडूंप्रमाणे दुर्गाचेही हे ध्येय आहे. मात्र, या खेळात नैपुण्य मिळवू असे दुर्गाला स्वप्नातही वाटले नव्हते. गंमत म्हणून सुरू केलेला खेळ आयुष्यातील अविभाज्य घटक बनतो, याचे जिवंत उदाहरण दुर्गाने अनुभवले आहे. ती म्हणते, ‘‘या खेळाकडे कसे वळले मलाच कळले नाही. मोठा भाऊ प्रणव याच्यासोबत मी सरावाला जायचे. तेव्हा मी पहिलीला होते. भावाला सराव करताना पाहून मलाही मजा यायची. प्रशिक्षक विजेंदर सिंग मग मलाही मैदानाचा एक फेरी मारायला सांगायचे. सुरुवातीला उत्साह वाटायचा. तिसरीत जाईपर्यंत असेच सुरू होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तिसरीत असताना स्थानिक स्पर्धामध्ये सहभाग घेतला. पाचवीत पहिल्यांदा राज्यस्तरीय स्पध्रेत सहभाग घेतला आणि त्यानंतर अ‍ॅथलेटिक्सचा गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली. मग प्रत्येक वर्षी स्पध्रेत सहभाग घेत गेले. आतापर्यंत मी १९ पदके जिंकली आहेत आणि हे पहिले आंतरराष्ट्रीय पदक आहे.’’
‘‘या प्रवासात संयम ठेवणे खूप महत्त्वाचे होते. सोबतच्या अनेक मुलींनी अध्र्यावर खेळ सोडला. प्रत्येकीची काही वैयक्तिक कारणे होती. आपल्यासोबतच्या मुली खेळ सोडतात, हे पाहून दडपण येत होते, परंतु संयम ठेवून पुढील वाटचाल केली,’’ असे दुर्गाने सांगितले.
ती पुढे म्हणाली, ‘‘प्रत्येक खेळाडू परिस्थितीशी झगडून इथपर्यंत पोहोचला आहे, परंतु सुदैवाने मला परिस्थितीशी झगडावे लागले नाही. वडील राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू असल्याने आणि भाऊ खेळाडू असल्याने घरच्यांचा पाठिंबा होताच. मीही कामगिरीत सातत्य राखले आणि एक एक उंची गाठली. मार्गदर्शक विजेंदर सिंग यांची बदली झाली तो काळ मात्र अजूनही लक्षात आहे. सरांची बदली होतेय, ही बाबच दडपण निर्माण करणारी होती.
त्यामुळे आपल्या कारकीर्दीला लगाम लागतो की काय, असे वाटू लागले होते, परंतु सहा महिन्यांत बदलीला स्थगिती मिळाली आणि मी सुटकेचा नि:श्वास टाकला.’’

क्रीडा मंत्र्यांकडून दुर्गाचा सत्कार
जागतिक शालेय अ‍ॅथलेटिकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारतात परतणाऱ्या महाराष्ट्राच्या दुर्गा देवरेचा क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते बुधवारी मुंबईत सत्कार करण्यात आला. ‘‘दुर्गाने शालेय जीवनातच संपादित केलेले यश कौतुकास्पद आहे. भविष्यातही दुर्गाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पध्रेत सहभाग घेऊन यश मिळवावे,’’ अशा शुभेच्छा तावडे यांनी यावेळी दिल्या.

minor girl ran away from forest half-naked young man who tried to rape was arrested
मुलीने अर्धनग्नावस्थेत जंगलातून काढला पळ… बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला अटक
inspirational story kalpana-saroj
बाराव्या वर्षी लग्न, सासरच्यांकडून छळ; दोन रुपयांपासून कमाईला सुरुवात करणाऱ्या कल्पना सरोज ९०० कोटींच्या मालकीण बनल्या कशा?
qualify as marriage
दीर्घकाळ एकत्र राहण्यास लग्नाचा दर्जा मिळत नाही…
nagpur love marriage marathi news, love marriage divorce marathi news
प्रेमविवाहानंतर संसार तुटण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ, तीन हजार प्रेमीयुगुलांनी घेतली भरोसा सेलची मदत

या पदकाबरोबर जबाबदारी आणि अपेक्षाही वाढल्या आहेत. त्यामुळे यापुढे आव्हान अधिकाधिक खडतर होत जाणार आहेत. त्यात टिकून राहण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे. या कसरतीत स्वत:चा आदर्श जगासमोर ठेवायचा आहे आणि ते इतके सोपे नाही.
– दुर्गा देवरे

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gold medal winners in world school competition durga deore determination

First published on: 09-07-2015 at 06:00 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×