एम. एम. सोमय्या (भारताचे माजी हॉकीपटू)

(शब्दांकन : ऋषिकेश बामणे)

भारतीय पुरुष हॉकी संघाच्या जिगरबाज शिलेदारांनी गुरुवारी इतिहास रचला. गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने जेव्हा अखेरच्या मिनिटात पेनल्टी कॉर्नर अडवला, तेव्हा मला अश्रू अनावर झाले. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील हा संघ नव्या भारताचे प्रतीक असून हॉकीचा सुवर्णकाळ परतला आहे, असे म्हणताना मला फार आनंद होत आहे. खरे तर अखेरच्या मिनिटात जेव्हा जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला, तेव्हा मी चिंतेत होतो. ४१ वर्षांपूर्वी मॉस्को ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत स्पेनलासुद्धा अखेरच्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. आम्ही ४-३ असे आघाडीवर होतो, तर स्पेनसाठी पेनल्टी कॉर्नर घेणाऱ्या जुआन अमतने त्या लढतीत हॅट्ट्रिक साकारली होती. मात्र त्याला गोल करण्यात अपयश आले आणि आम्ही एकच जल्लोष केला. त्यामुळे आजचा भारत-जर्मनी यांच्यातील सामना माझ्या आठवणींना उजाळा देणारा ठरला. डिसेंबर २०१८मध्ये भुवनेश्वरला झालेल्या विश्वचषकात भारताला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. मात्र त्या विश्वचषकात भारताने खरेच उत्तम खेळ केला होता. त्यावेळीच हा संघ टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकासाठी दावेदारी पेश करू शकतो, याचे संकेत मला मिळाले. ऑलिम्पिकसाठी रवाना होण्यापूर्वी कर्णधार मनप्रीत आणि प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी भारत पदकासह माघारी परतेल, असे ठामपणे सांगितले होते. स्वत:चे शब्द खरे करून दाखवण्यापेक्षा अभिमानास्पद बाब काहीच असू शकत नाही. आता थोडय़ा वेळापूर्वीच मी देशातील काही भागांत चाहत्यांनी हॉकी स्टीकसह ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढल्याची चित्रफीत पाहिली. भारतात हॉकीला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत, हे यावरूनच दिसून येते.