वानखेडेवरून.. : कसोटीच्या मेजवानीसाठी चाहत्यांची झुंबड

मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सर्वाधिक ६,२५३ प्रेक्षकांनी सामन्याला हजेरी लावली

ऋषिकेश बामणे, लोकसत्ता

मुंबई : वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत-न्यूझीलंड लढतीतील रविवारच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली. पाच वर्षांनी कसोटी क्रिकेटचे मुंबईत पुनरागमन झाल्याने तसेच भारत आजच विजय मिळवणार, या आशेने मोठय़ा प्रमाणात प्रेक्षकांनी वानखेडे गाठले.

मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सर्वाधिक ६,२५३ प्रेक्षकांनी सामन्याला हजेरी लावली. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर ८,५०० तिकिटेच या लढतीसाठी उपलब्ध आहेत. पहिल्या दोन दिवशी मात्र तिकिटांचा आकडा चार हजारांच्या आसपासच होता.

भारताने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतल्याने सामना तिसऱ्या दिवशीच संपणार, असे वाटले. त्यामुळे ज्यांच्याकडे चौथ्या दिवसांचे तिकीट होते, तेसुद्धा सकाळपासून वानखेडेबाहेर कुठे रविवारचे तिकीट मिळते का, याची पाहणी करताना आढळले. साधारणपणे ५०० रुपयांमध्ये दिलीप वेंगसरकर आणि सचिन तेंडुलकर स्टँडचे एका दिवसाचे तिकीट मिळते; परंतु प्रेक्षक एक हजार किंवा त्याहूनही अधिक रुपये मोजण्यास तयार होते.

विद्यापीठ क्रीडा संकुलाच्या येथून असलेल्या प्रवेशद्वारावर सकाळी किमान ११ वाजेपर्यंत लांबच्या लांब रांग लागली होती. तर मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच विनू मंकड गेटबाहेर चाहते दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाला तरी तिकिटाची कुठून तरी व्यवस्था होते का, यासाठी धडपड करत होते.

स्टेडियमबाहेर यामुळे सातत्याने गर्दी जमा झाल्याने पोलिसांना काही जणांवर जबरदस्तीही करावी लागली. त्याशिवाय ‘एमसीए’ पॅव्हेलियनच्या येथे एका चाहत्याचा सुरक्षा कर्मचाऱ्याशी वाद झाल्याचेही निदर्शनास आले. तूर्तास सामना लांबला असून भारताला विजयासाठी पाच बळींची आवश्यकता असल्याने चाहते तितक्याच उत्साहाने वानखेडे गाठणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

स्पायडरकॅममुळे अडथळा

पाऊस, अंधूक सूर्यप्रकाश अथवा अन्य विविध कारणांनी खेळ थांबल्याचे यापूर्वी आपण अनेकदा पाहिले आहे; परंतु रविवारी भारत-न्यूझीलंड कसोटीतील तिसऱ्या दिवशी चक्क स्पायडरकॅममध्ये बिघाड झाल्याने पंचांना खेळ स्थगित करावा लागला. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावातील चौथ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर अश्विनने टॉम लॅथमला पायचीत पकडले. यानंतर पुढील फलंदाज मैदानात प्रवेश करेपर्यंत मिडविकेटच्या दिशेला स्पायडरकॅममध्ये काही समस्या झाल्याचे दिसून आले. कोहली, सूर्यकुमार यादव, रविचंद्रन अश्विन या खेळाडूंनी त्वरितच स्पायडरकॅमच्या दिशेने धाव घेतली. अश्विनने ‘बाहुबली’प्रमाणे स्पायडरकॅमला उचलण्याचा प्रयत्न करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले; परंतु काही मिनिटे वाया जाऊनही स्पायडरकॅम जागचा न हलल्याने पंचांना निर्धारित वेळेच्या १५ मिनिटांपूर्वीच चहापानाची विश्रांती घेण्याचा निर्णय घ्यावा लागला. पॅव्हेलियनमध्ये परतताना कोहली स्पायडरकॅमला हातवारे करून वर जाण्याचे खुणावत होता.

.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Good audience response in wankhede stadium during india new zealand test match zws

ताज्या बातम्या