Jasprit Bumrah Comeback In MI vs KKR Match: आयपीएल २०२६ स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ आपल्या होम ग्राऊंडवर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सामना करणार आहे. यंदा मुंबई इंडियन्सचा संघ सहाव्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याच्या प्रयत्नात असणार आहे. पहिल्या सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराह बंगळुरूतील सेंटर ऑफ एक्सिलेंसमध्ये होता. त्यामुळे तो पहिला सामना खेळणार की नाही? अशी चर्चा रंगली होती. आता या सामन्याआधी मुंबई इंडियन्स संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

बुमराहने काही दिवसांपूर्वी झालेल्या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर आयपीएल सुरू होण्याआधी तो बंगळुरुतील सेंटर ऑफ एक्सिलेंसमध्ये होता. इथे त्याने आपल्या फिटनेसवर आणि वार्कलोड मॅनेज करण्यावर काम केलं. कारण त्याला इथुन पुढे २ महिने आयपीएल खेळायचं आहे.

मुंबई इंडियन्स संघाचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी बुमराहबाबत मोठी अपडेट दिली आहे. जयवर्धने म्हणाले, “वर्ल्डकप आधी खूप जास्त क्रिकेट झालं आहे. त्याआधी काही कसोटी मालिका झाल्या होत्या. द्विपक्षीय मालिकाही झाल्या. काही खेळाडूंवर कामाचा खूप जास्त ताण होता. विशेषतः गोलंदाजांवर, ज्यांना एका आठवड्याच्या अतिरिक्त विश्रांतीची गरज होती.”

तसेच ते पुढे म्हणाले की, “जस्सीबद्दल बोलायचं झालं तर, तो संघात परतला आहे. तो खेळण्यासाठी उपलब्ध आहे.” ही मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण बुमराह पहिल्या सामन्याला मुकणार अशी चर्चा रंगली होती. पण आता बुमराह आल्याने गोलंदाजी आक्रमण आणखी मजबूत होणार आहे.

आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी असा आहे मुंबई इंडियन्सचा संघ:

रोहित शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, नमन धीर, शार्दुल ठाकूर (ट्रेड), शेरफन रूदरफोर्ड (ट्रेड), मयंक मार्कंडे (ट्रेड), क्विंटन डीकॉक दीपक चहर, जसप्रीत बुमराह, कर्ण शर्मा, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, मिचेल सँटनर, कार्बिन बॉश, राज अंगद बावा, अल्लाह गजनफर, अश्वनी कुमार, रघु शर्मा, अथर्व अंकोलेकर, मयंक रावत, दानिश मलेवार, मोहम्मद इझहर