Sunrisers Hyderabad Announced Replacement: आयपीएल २०२६ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा संघ चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी सनरायझर्स हैदराबादसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. संघातील वेगवान गोलंदाज डेव्हिड पेन दुखापतीमुळे बाहेर झाला होता. त्याच्या जागी आता दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्जीची रिप्लेसमेंट म्हणून निवड करण्यात आली आहे.
गेराल्ड कोएत्जीसारखा अनुभवी गोलंदाज संघात येणं ही सनरायझर्स हैदराबादसाठी आनंदाची बातमी आहे. याआधी त्याने मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०२४ मध्ये त्याला मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. मुंबईकडून खेळताना त्याने १० सामन्यांमध्ये १३ फलंदाजांना माघारी धाडलं होतं. त्याची ही कामगिरी पाहून गुजरात टायटन्सने २०२५ मध्ये त्याला २.४ कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं.
गुजरात टायटन्सने त्याला आपल्या संघात स्थान तर दिलं, पण फार सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. ४ सामन्यांमध्ये त्याला २ गडी बाद करता आले. आयपीएलमध्ये सलग तिसऱ्या वर्षी त्याला तिसऱ्या संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. आता तो कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
डेव्हिड पेन सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग होता. पण दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं होतं. त्याच्या जागी आता गेराल्ड कोएत्जीला संधी देण्यात आली आहे. डेव्हिड पेनला सनरायझर्स हैदराबादकडून २ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने २ गडी बाद केले. आता गेराल्ड कोएत्जीसारखा अनुभवी गोलंदाज आल्याने हैदराबादची ताकद दुपटीने वाढणार आहे.
सनरायझर्स हैदराबादच्या नेतृत्वाची जबाबदारी पॅट कमिन्सकडे आहे. पण त्याच्या अनुपस्थितीत हैदराबादच्या नेतृत्वाची जबाबदारी इशान किशनकडे सोपवण्यात आली आहे. इशान किशनच्या नेतृत्वाखाली खेळताना हैदराबादने ५ सामने खेळले आहेत. यापैकी २ सामने जिंकले आहेत. तर ३ सामन्यांमध्ये हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ४ गुणांसह हैदराबादचा संघ पाचव्या स्थानी आहे.
