मिहीर वसावदा

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने केंद्र सरकारने पाकिस्तानचे संघ आणि क्रीडापटूंसंदर्भात धोरण जारी केलं आहे. विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघटनांतर्फे आयोजित बहुदेशीय स्पर्धांसाठी पाकिस्तानचा संघ भारतात येऊन खेळू शकतो असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. मात्र भारत-पाकिस्तान उभय देशांमध्ये कोणत्याही स्वरुपाची मालिका आयोजित केली जाणार नाही हेही केंद्र सरकारने स्पष्ट केलं.

५ मे रोजी जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार, पाकिस्तानचे संघ आणि खेळाडू भारतात होणाऱ्या बहुदेशीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतील. खेळाडू, तांत्रिक अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी यांना भारतात स्पर्धेसाठी येण्यादृष्टीने सुलभपणे व्हिसा मिळू शकेल अशी तरतूद करण्यात आली आहे.

भारत-पाकिस्तान देशांदरम्यानच्या मालिका आणि बहुविध देशांची स्पर्धा यातला फरक केंद्र सरकारने अधोरेखित केला आहे. भारतीय संघ पाकिस्तानात कोणत्याही खेळाची मालिका अथवा सामने खेळण्यासाठी जाणार नाही याचा पुनरुच्चार केंद्र सरकारने केला. त्याचप्रमाणे पाकिस्तानचा संघ कोणत्याही खेळातल्या मालिकेशी फक्त भारताविरुद्ध खेळण्यासाठी भारतात येऊ शकणार नाही. मात्र बहुविध देशांच्या स्पर्धेची परिमाणं वेगळी असतात. त्यामुळे अपवादात्मक परिस्थिती म्हणून पाकिस्तानच्या संघांना, खेळाडूंना अशा स्पर्धांसाठी भारतात प्रवेश दिला जाईल असं केंद्र सरकारने म्हटले आहे.

अशा स्पर्धांमध्ये पाकिस्तानचा संघ त्या स्पर्धेत भारताचा संघही सहभागी होईल असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. हॉकी असो किंवा स्क्वॉश किंवा अन्य कोणताही खेळ- अनेक देश सहभागी होत असलेली स्पर्धा असेल तर पाकिस्तानच्या संघासाठी भारतात येणं जिकिरीचं व्हायचं. पण नव्या धोरणामुळे पाकिस्तानचा संघ अशा स्पर्धांमध्ये सहजपणे सहभागी होऊ शकेल.

विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघटना तसंच ऑलिम्पिक आयोजन समिती, कॉमनवेल्थ संयोजन समिती तसंच आशियाई क्रीडा स्पर्धा या संघटनांच्या तत्वांशी आम्ही कटिबद्ध आहोत असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. नवं धोरण लागू करण्यामागे केंद्र सरकारने भविष्याचा विचार केला आहे. २०३० मध्ये भारतात कॉमनवेल्थ स्पर्धा होणार आहे. २०३६ ऑलिम्पिक साठी भारताने आवेदन सादर केलं आहे. २०३८ आशियाई स्पर्धेसाठीही भारत उत्सुक आहे. ऑलिम्पिक काऊंसिल ऑफ एशियाचे प्रतिनिधी काही महिन्यातच भारताचा दौरा करणार आहेत. २०२९ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा भारतात होणार आहे तर २०३१ मध्ये वनडे वर्ल्डकप भारतात होणार आहे. या सगळ्या स्पर्धा बहुदेशीय असल्यामुळे पाकिस्तानचा संघ भारतात येऊन खेळू शकतो.