Who Is Shubham Ranjane: भारत आणि अमेरिका या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील तिसरा सामना पार पडला. या सामन्यात भारताचा विजय झाला, पण हा विजय पराभवापेक्षा कमी नाही. कारण गतविजेता संघ, जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असलेला संघ आणि आयसीसीच्या रँकिंगमध्ये टॉपचे फलंदाज आणि गोलंदाज असलेला संघ अशी कामगिरी करतो, तेव्हा कोणालाही विश्वास बसत नाही. मुळात हा सामना भारत विरूद्ध भारत असाच होता. कारण अंगावर अमेरिकेची जर्सी असी तरीदेखील हे खेळाडू मूळचे भारतीयच आहेत. गेल्यावेळी झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत मराठमोळा सौरव नेत्रावळकर तुफान चर्चेत राहिला होता. यावेळी पुण्यातील मराठमोळ्या शुभम रांजणेने मुंबईत भारतीय खेळाडूंना चांगलाच घाम फोडला.
क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की, एकदा तरी वर्ल्डकप खेळावं. पण हा वर्ल्डकप दुसऱ्या देशाकडून खेळताना आपल्याच देशाविरूद्ध खेळावा लागेल असं क्वचितच घडतं. असंच काहीसं शुभम रांजणेसोबत घडलं. शुभम जेव्हा वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेची वर्ल्डकप जर्सी परिधान करून भारताविरूद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरला, हा क्षण ऐतिहासिक क्षणापेक्षा कमी नव्हता. कारण रांजणे कुटुंबातील तिसरी पिढी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरली आहे. शुभम रांजणेचे आजोबा वसंत रांजणे यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. तर त्याचे वडील सुभाष रांजणे यांनी १९ वर्षांखालील संघातून देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे.
रांजणे कुटुंबाने भारतीय क्रिकेटमध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. १९६० च्या दशकात त्यांनी महाराष्ट्राच्या रणजी संघातून पदार्पण केलं होतं. पदार्पणात त्यांनी चमकदार कामगिरी केली होती. या सामन्यात हॅट्रिक घेऊन त्यांनी ९ गडी बाद करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर वेस्ट इंडिजविरूद्ध खेळताना त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं दार उघडलं, पण त्यांना या खेळपट्टीवर त्यांना फार काळ टिकून राहता आलं नाही.
आजोबांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं, पण वडिलांना अंडर-१९ संघापर्यंत मजल मारता आली. १९८७ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या अंडर-१९ संघात शुभम रांजणेचे वडिल सुभाष रांजणे यांचा देखील समावेश होता. पण मुलगा एक पाऊल पुढे गेला, शुभम रांजणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि वर्ल्डकप खेळण्याची संधीही मिळाली. मुख्य बाब म्हणजे वर्ल्डकप स्पर्धेत त्याच संघाविरूद्ध पदार्पण केलं, जिथे त्याचं बालपण गेलं. २०२२-२३ मध्ये झालेल्या रणजी हंगामात त्याला मुंबईकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. पण राष्ट्रीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने मेजर लीग क्रिकेटमध्ये टेक्सास सुपर लीगमध्ये लक्षवेधी कामगिरी केली. या कामगिरीच्या बळावर त्याने अमेरिकेच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवलं. आता भारताविरूद्ध खेळताना त्याने २२ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. अमेरिकेने हा सामना गमावला, पण अमेरिकेच्या खेळाडूंनी चांगलाच भाव खालला.

