कारकिर्दीत शिखरावर पोहोचण्याची प्रत्येकाची इच्छा असते. टेनिसपटूंसाठी ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद हा शिखरावर पोहोचण्याचा पहिला टप्पा. मोसमाच्या सुरुवातीलाच हे शिखर गाठावे, यासाठी कित्येक महिन्यांपासून टेनिसपटू स्वत:ला सरावात झोकून देतात. गेल्या वर्षी राफेल नदाल, सेरेना विल्यम्स, मारियन बाटरेली या बुजुर्ग खेळाडूंबरोबरच नोव्हाक जोकोव्हिच, अँडी मरे, व्हिक्टोरिया अझारेंका या खेळाडूंनीही ग्रँड स्लॅम विजेतेपदावर नाव कोरले. आता नव्या मोसमाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा टेनिसकोर्टवर हुकमत गाजवण्यासाठी तरुणांबरोबच बुजुर्ग खेळाडूही सज्ज झाले आहेत.
ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या मोसमातील अखेरची स्पर्धा असलेल्या अमेरिकन स्पर्धेनंतर चार महिन्यांनी ऑस्ट्रेलियन स्पर्धा होते. त्यामुळे मधल्या चार महिन्यांच्या कालावधीत खेळाडूंना शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी भरपूर अवधी मिळतो. त्याचबरोबर आपल्या चुकांमध्ये सुधारणा करण्याचीसुद्धा संधी मिळते. त्यामुळेच वर्षांच्या सुरुवातीला होणाऱ्या हार्डकोर्टवरील ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडू सर्वोत्तम कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. नव्या दमाने, उत्साहाने प्रत्येक खेळाडू या स्पर्धेत उतरत असल्यामुळे चाहत्यांना रंगतदार सामन्यांची पर्वणी मिळते.
ऑस्ट्रेलियन स्पर्धेवर गेल्या काही वर्षांत सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने वर्चस्व गाजवले आहे. चार वेळा अजिंक्यपद मिळवणाऱ्या जोकोव्हिचची शैली ही हार्टकोर्टसाठी अनुकूल मानली जाते. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याने राफेल नदालवर मात करत  गतमोसमाची अखेर आपल्या लौकिकाला साजेशी केली होती. जोकोव्हिचलाच ऑस्ट्रेलियन स्पर्धेत जेतेपदासाठी दावेदार समजले जात आहे. पण त्याच्यासमोर नदालसह अँडी मरे, रॉजर फेडरर यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंचे आव्हान असणार आहे. नदालही हार्डकोर्टवर अव्वल दर्जाचा खेळाडू मानला जातो. पाठीच्या दुखण्यातून तंदुरुस्त झाल्यानंतर त्याने दहा स्पर्धा जिंकल्या आहेत. नदाल फॉर्मात येतो, तेव्हा त्याला हरवणे कठीण असते. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नदालने २००९मध्ये ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे अखेरचे जेतेपद पटकावले होते. त्यामुळे हार्डकोर्टवर दबदबा राखण्यासाठी नदालला प्रतिस्पध्र्याचे आव्हान मोडीत काढावे लागणार आहे.
इंग्लंडच्या अँडी मरेने २०१२मध्ये ऑलिम्पिक आणि विम्बल्डन स्पर्धेत अव्वल दर्जाचे यश मिळविले होते. २०१३च्या जागतिक स्पर्धेत त्याला पाठीच्या दुखण्यामुळे माघार घ्यावी लागली होती. आता २०१४ चे वर्ष गाजविण्यासाठी तो आतूर झाला आहे. ऑस्ट्रेलियन स्पर्धा चार वेळा जिंकणाऱ्या रॉजर फेडरर याला गेल्या वर्षी निराशाजनक कामगिरीला सामोरे जावे लागले होते. एकाही ग्रँड स्लॅम स्पर्धेत त्याला विजेतेपद मिळविता आले नव्हते. संभाव्य विजेत्यांमध्ये त्याचे स्थान नसले तरी येथील अनुभव ही त्याची जमेची बाजू आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये अनेक मातब्बर खेळाडूंना घरचा रस्ता दाखवणाऱ्या आणि अलीकडेच झालेल्या चेन्नई खुल्या स्पर्धेचे विजेतेपद मिळविणाऱ्या स्टॅनिस्लॉस वॉवरिन्का याच्याकडून आश्चर्यजनक कामगिरीची अपेक्षा आहे.
महिलांमध्ये सेरेना विल्यम्स हीच विजेतेपदाची मुख्य दावेदार मानली जात आहे. वयाची तिशी ओलांडली तरी आपण अजूनही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकू शकतो, हे तिने वेळोवेळी दाखवून दिले आहे. गेल्या वर्षी अनेक स्पर्धावर अधिराज्य गाजवणाऱ्या सेरेनाचा झंझावात रोखण्याची किमया कोण दाखवितो, हीच उत्सुकता आहे. गत वर्षी ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या जेतेपदावर व्हिक्टोरिया अझारेन्काने मोहोर उमटवली होती. सेरेनाला हरवण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे. मात्र त्यासाठी अझारेन्काला आपल्या गुणवत्तेला साजेसा खेळ करावा लागणार आहे. माजी विजेती मारिया शारापोवा हिच्याकडूनही अव्वल कामगिरीची अपेक्षा आहे. प्रत्येक ग्रँड स्लॅम स्पर्धेत विजेतेपद मिळवित आपल्या चतुरस्र खेळाचा प्रत्यय तिने घडविला आहे. मात्र तिने आपल्या खेळात सातत्य आणण्याची आवश्यकता आहे. चीनचे आव्हान असलेली ली ना हिच्याकडे आश्चर्यजनक कामगिरी करण्याची क्षमता आहे.
पेत्रा क्विटोवा, सारा इराणी, अग्निस्झेका रॅडवान्स्का आणि येलेना यांकोव्हिच यांच्याकडेही विजेतेपद मिळविण्याची ताकद आहे. प्रत्यक्ष उपांत्य व अंतिम लढतीत या ताकदीचा कल्पकतेने उपयोग केला तर विजेतेपदावर आपले नाव कोरण्याची संधी त्या साध्य करू शकतील.
भारतीय खेळाडूंची मदार प्रामुख्याने दुहेरीतच आहे. लिएण्डर पेसने राडेक स्टेपानेकच्या साथीने गेल्या वर्षी अमेरिकन स्पर्धाजिंकून ४०व्या वर्षीही आपण ग्रँड स्लॅम विजेता होऊ शकतो, हे दाखवून दिले आहे. त्याच्याकडून पुन्हा तशीच कामगिरी अपेक्षित आहे. रोहन बोपण्णा आणि पाकिस्तानचा ऐसाम उल-हक कुरेशी ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. ‘इंडो-पाक एक्स्प्रेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जोडीने अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत.  त्यामुळे त्यांच्याकडूनही जेतेपदाची अपेक्षा बाळगता येऊ शकते. महिलांमध्ये सानिया मिर्झा ही दुहेरीत भारताचे आशास्थान आहे. ती क्रोएशियाच्या कारा ब्लॅकच्या साथीने उतरणार आहे.
दुहेरीच्या तुलनेत एकेरीत भारतीय खेळाडूंकडून फारशा अपेक्षा ठेवणेच चुकीचे होईल. सोमदेव देववर्मन याच्यावर एकेरीत भिस्त आहे. सोमदेवची गेल्या काही महिन्यांतील कामगिरी निराशाजनक होत आहे. त्याचबरोबर सोमदेवला पहिल्याच फेरीत स्पेनच्या फेलिसिओ लोपेझ या बलाढय़ खेळाडूचे आव्हान असणार आहे. त्याला विजय मिळविण्यासाठी खूपच झगडावे लागणार आहे. चेन्नई स्पर्धेत त्याला रामकुमार रामनाथन या १९ वर्षीय खेळाडूने पराभवाचा धक्का दिला होता. हे लक्षात घेतल्यास मेलबर्नमध्ये त्याचा निभाव लागणे कठीणच आहे. त्यामुळे एकेरीत भारतीय खेळाडूने जेतेपदावर नाव कोरणे हे दिवास्वप्नच ठरणार आहे.
नव्या मोसमाची सुरुवात धडाकेबाज करण्यासाठी सर्वच खेळाडू ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे थरारपूर्ण लढतींसह नव्या वर्षांची पर्वणी अनुभवण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.