भारताला १७ वर्षांखालील गटाची विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्याची संधी देण्यात आली आहे. या स्पर्धेद्वारे हा खेळ अधिकाधिक लोकाभिमुख करण्याची ही सुवर्णसंधी असून त्याचा फायदा देशातील संघटकांनी घेतला पाहिजे, असे आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फिफा) उपसंचालक व स्पर्धाप्रमुख पिनाकी अल्वारेझ यांनी सांगितले.
२०१७मध्ये होणाऱ्या या स्पध्रेकरिता विविध स्टेडियम्सची पाहणी करण्यासाठी फिफाची तीन सदस्य समिती भारत दौऱ्यावर आली आहे. जवाहरलाल नेहरू स्टेडियम, आंबेडकर स्टेडियम (नवी दिल्ली), सॉल्ट लेक स्टेडियम (कोलकाता), कर्नाटक राज्य स्टेडियम (बंगळुरू), नेहरू स्टेडियम (मडगाव), तसेच कोची, गुवाहाटी व पुण्यातील आंतरराष्ट्रीय स्टेडियम्सची ते पाहणी करीत आहेत.
आगामी १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा हा फिफाने खेळाच्या विकासाकरिता केलेल्या विविध योजनांचाच एक भाग आहे. भारतात या खेळासाठी विपुल नैपुण्य उपलब्ध आहे. त्यामुळेच आम्ही ही स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी भारताकडे दिली आहे. भारताने आजपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे यशस्वी संयोजन केले आहे. आता २०१७ची विश्वचषक स्पर्धाही ते यशस्वीरीत्या आयोजित करतील अशी मला खात्री आहे.
अल्वारेझ यांच्यासमवेत फिफाच्या आशियाई विभाग विकास अधिकारी शाजी प्रभाकर, तसेच विजय पार्थसारथी, अनिल कामत, रोमा खन्ना आदी फुटबॉल संघटकांनीही पुण्याच्या शिवछत्रपती स्टेडियममधील विविध सुविधांची सविस्तर पाहणी केली.