बंगळूरु : अष्टपैलू कॅमेरून ग्रीन बोटाला झालेल्या दुखापतीतून सावरत असून ९ फेब्रुवारीपासून नागपूर येथे होणाऱ्या भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तो खेळण्याची शक्यता बळावली आहे, अशी माहिती ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अँड्रय़ू मॅकडॉनल्ड यांनी शनिवारी दिली.ऑस्ट्रेलियाचे अलूर येथे चारदिवसीय सराव शिबीर सुरू असून यात २३ वर्षीय ग्रीनने गोलंदाजीचा सराव केला. या पार्श्वभूमीवर मॅकडॉनल्ड म्हणाले, ‘‘ग्रीन पहिल्या कसोटीत खेळणारच हे स्थान निश्चित नसले, तरी गोलंदाजीचा सराव करताना त्याला फारसा त्रास झाला नाही. गेल्या काही दिवसांत त्याने चांगली प्रगती केली आहे. तो दुखापतीतून इतक्या लवकर सावरेल हे आम्हाला अपेक्षित नव्हते. त्यामुळे पहिल्या कसोटीतील त्याच्या सहभागाची शक्यता बळावली आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास त्याला संधी मिळू शकेल.’’
फिरकीपटूंचे दर्जेदार पर्याय -कमिन्स
भारतात यशस्वी ठरण्यासाठी प्रमुख ऑफ-स्पिनर नेथन लायनसह दर्जेदार फिरकीपटूंचे पर्याय आमच्याकडे उपलब्ध आहेत, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नमूद केले. ‘‘आमच्याकडे बोटांच्या साहाय्याने चेंडूला फिरकी देणारे फिरकीपटू, मगगटी फिरकीपटू, मिचेल स्टार्कचे पुनरागमन झाल्यावर डावखुरा वेगवान गोलंदाज असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. २० गडी बाद करण्याची सर्वोत्तम संधी देणाऱ्या गोलंदाजांचीच आम्ही अंतिम ११ जणांमध्ये निवड करू,’’ असे कमिन्स म्हणाला. ऑस्ट्रेलियाच्या संघात लायन आणि टॉड मर्फी या दोन ऑफ-स्पिन टाकणाऱ्या गोलंदाजांसह डावखुरा फिरकीपटू अॅश्टन एगर आणि लेग-स्पिनर मिचेल स्वेपसनचा समावेश आहे.