GT beat DC by Just 1 Run In IPL 2026: दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अटीतटीच्या सामन्यात गुजरातने अखेरच्या चेंडूवर बाजी मारली आहे. गुजरातने दिल्लीचा घरच्या मैदानावर फक्त एका धावेने पराभव केला. दिल्लीकडून केएल राहुलने ९२ धावांची खेळी केली, तर डेव्हिड मिलरने २० चेंडूत ४१ धावा केल्या, पण संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकले नाहीत. तर गुजरातकडून रशीद खानच्या ३ विकेट्स महत्त्वपूर्ण ठरल्या. यासह गुजरात टायटन्सने यंदाच्या हंगामातील पहिला विजय नोंदवला आहे.

दिल्ली-गुजरात सामन्यातील अखेरच्या दोन षटकांमध्ये नेमकं काय घडलं?

दिल्लीला अखेरच्या षटकांमध्ये १२ चेंडूत ३६ धावांची गरज होती. १९वं षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज आला. या षटकात मिलरने किलर फलंदाजी करत सामना अटीतटीचा केला. मिलरने या षटकात दोन षटकार व एक चौकार लगावला. तर विप्रज निगमने एक चौकार लगावला आणि या षटकात २३ धावा कुटल्या. यासह दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी अखेरच्या षटकांत १३ धावांची गरज होती. विप्रज निगम स्ट्राईकवर होता, तर प्रसिध कृष्णा गोलंदाजी करत होता आणि त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला. पाचव्या चेंडूवर मोठा फटका खेळताना विप्रज झेलबाद झाला आणि नंतर आलेल्या कुलदीपने लगेचच एक धाव घेत मिलरला स्ट्राईक दिली.

आता दिल्लीला विजयासाठी ३ चेंडूत ८ धावांची गरज होती. यानंतर तिसऱ्या चेंडूवर मिलरने दणदणीत षटकार लगावला. त्यानंतर २ चेंडूत २ धावांची गरज असताना पाचव्या चेंडूवर मिलर व कुलदीपने एकही धाव घेतली नाही, ज्यामुळे दिल्लीवरचा दबाव वाढला आणि अखेरचा चेंडू निर्णायक ठरला. अखेरच्या चेंडूवर दिल्ली फक्त एक धाव घेण्यात यशस्वी ठरली. यासह गुजरातने एका धावेने सामना जिंकला. डेव्हिड मिलरने पाचव्या चेंडूवर २ धावांची गरज असताना एक धाव घेण्यास नकार दिल्याची चूक दिल्लीला महागात पडली आणि परिणामी संघाने एका धावेने सामना गमावला.

गुजरात टायटन्सनने दिलेल्या २११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरूवात चांगली झाली. पथुम निसांका व केएळ राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी रचली. पथुम निसांका २४ चेंडूत ६ चौकार व एका षटकारासह ४१ धावा करत बाद झाला. यानंतर नितीश राणा ५ धावा, समीर रिझवी गोल्डन डक तर कर्णधार अक्षर पटेल २ धावांवर बाद झाले. तर डेव्हिड मिलर १२ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. फिल्डिंग करताना मिलरच्या हाताला दुखापत झाली होती. केएल राहुल मात्र २९ धावांवर अर्धशतक करत खेळत होता. पण मोहम्मद सिराजच्या १७व्या षटकात फटका मारण्याच्या प्रयत्नात केएल राहुल झेलबाद झाला. राहुलने ५२ चेंडूत ११ चौकार व ४ षटकारांसह ९२ धावांची उत्कृष्ट खेळी केली. डेव्हिड मिलरने २० चेंडूत ३ चौकार व ३ षटकारांसह ४१ धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून रशीद खानने ३ विकेट्स तर प्रसिध कृष्णाने १ विकेट घेतली.

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकत प्रथम गुजरात टायटन्सला फलंदाजीसाठी पाचारण केलं. गुजरातच्या टॉप-५ फलंदाजांनी मिळून २१० धावांचा डोंगर उभारला. साई सुदर्शन १२ धावा करत लवकर बाद झाला. यानंतर आलेल्या जोस बटलरने संघाचा डाव सावरत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. बटलर २७ चेंडूत ३ चौकार व ५ षटकारांसह ५२ धावा करत बाद झाला. यानंतर कर्णधार शुबमन गिल व वॉशिंग्टन सुंदर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६० चेंडूत १०४ धावांची भागीदारी रचली. शुबमन गिलने मोठ्या प्रतिक्षेनंतर टी-२० मध्ये अर्धशतक झळकावलं.

शुबमन गिलने या सामन्यात ४५ चेंडूत ४ चौकार व ५ षटकारांसह ७० धावा केल्या. तर वॉशिंग्टनने पहिलं आयपीएल अर्धशतक झळकावलं. वॉशिंग्टनने ३२ चेंडूत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ५५ धावांची खेळी केली. तर ग्लेन फिलिप्सने १४ धावा केल्या. दिल्लीकडून मुकेश कुमारने २ विकेट्स तर लुंगी एनगिडी व कुलदीप यादवने १-१ विकेट्स घेतल्या.