गुजरात टायटन्सने ऋषभ पंतच्या लखनौ सुपर जायंट्स संघाचा त्यांच्याच घरच्या मैदानावर ७ विकेट्सने सहज पराभव केला आहे. गुजरातकडून शुबमन गिल, जोस बटलर आणि प्रसिध कृष्णा यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. तर गुजरातच्या पद्धतशीर गोलंदाजी माऱ्यापुढे लखनौचा संघ २० षटकांत फक्त १६४ धावा करण्यात यशस्वी ठरला.

गुजरातने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि लखनौ संघाला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. लखनौ संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १६४ धावा केल्या. तर गुजरातने जोस बटलर आणि शुबमन गिलच्या खेळीच्या बळावर १८.४ षटकांत सहज विजय मिळवला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना साई सुदर्शन १५ धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर शुबमन गिल आणि जोस बटलर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला. जोस बटलरने ६० तर शुबमन गिलने ५६ धावांची खेळी केली. वॉशिंग्टन सुंदरने १३ चेंडूत २१ धावांची खेळी करत गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

गुजरातने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत लखनौच्या धडाकेबाज फलंदाजांना रोखलं. लखनौच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. एडन मारक्रम आणि मिचेल मार्श या अनुभवी जोडीकडून लखनौला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र ते अपेक्षित सुरुवात देऊ शकले नाहीत. कर्णधार ऋषभ पंत १८ धावा करून तंबूत परतला. आयुष बदोनी स्थिरावतोय वाटत असतानाच बाद झाला. मागच्या सामन्याचा नायक मुकुल चौधरी १८ धावा करून तंबूत परतला. निकोलस पूरनही झटपट तंबूत परतला. अब्दुल समदही अपयशी ठरला. गुजरातच्या गोलंदाजांनी उसळत्या चेंडूचा मारा करत लखनौच्या फलंदाजांना निष्प्रभ केलं. प्रसिध कृष्णाने ४ विकेट्स घेत लखनौच्या डावाला खिंडार पाडलं.