GT beat PBKS by 4 wickets: गुजरात टायटन्सने अखेरच्या षटकात टेबल टॉपर पंजाब किंग्सवर ४ विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. या विजयासह आता गुजरात टायटन्स संघाचेही १२ गुण झाले आहेत. पण १३ गुणांसह पंजाब किंग्सचा संघ अजूनही गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहे. पंजाबला प्लेऑफ गाठण्यासाठी फक्त दोन सामने जिंकण्याची गरज आहे. पण प्लेऑफच्या उंबरठ्यावर असताना पंजाबने गेले दोन सामने गमावले आहेत. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना १६४ धावांचं आव्हान दिलं होतं, गुजरातने हे आव्हान १९.४ षटकांत गाठलं.
गुजरातच्या डावातील अखेरच्या दोन षटकांत काय घडलं?
गुजरात टायटन्सला अखेरच्या २ षटकांत म्हणजेच १२ चेंडूत विजयासाठी १७ धावांची गरज होती. अर्शदीप १९वं षटक टाकण्यासाठी आला. अर्शदीपने पहिल्या चार चेंडूवर ५ धावा दिल्या आणि पाचव्या चेंडूवर जेसन होल्डरला बाद करत संघाला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. यासह आता अखेरच्या षटकात गुजरातला विजयासाठी ११ धावांची गरज होती. मार्कस स्टॉयनिसला अखेरचं षटक टाकण्याची जबाबदारी देण्यात आली. त्याने पहिला चेंडू वाईड टाकला, यानंतर पहिल्या लीगल चेंडूवर यॉर्कर चुकल्याने अरशद खानने चौकार लगावला. यानंतर अरशदने मोठा फटका खेळला, पण सूर्यांश झेल टिपू शकला नाही आणि तितक्यात दोन धावा घेतल्या. चौथा चेंडू डॉट बॉल राहिला. यासह ३ चेंडूत ४ धावांची गरज होती, चौथा चेंडू यॉर्कर टाकला आणि चेंडू टोलवून अरशद एक धाव घेण्यासाठी धावला आणि स्टॉयनिस त्याला धावबाद करण्यात अपयशी ठरला. दुसऱ्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरने षटकार लगावत संघाला शानदार विजय मिळवून दिला.
पंजाबने दिलेल्या १६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरूवात चांगली झाली. पण शुबमन गिल लवकर बाद झाला. गिल ५ धावांवर बाद झाल्यानंतर साई सुदर्शनने ४१ चेंडूत ५ चौकार व एका षटकारासह ५७ धावांची खेळी केली. तर जोस बटलर २६ धावा करत बाद झाला. निशांत सिंधूने १५ धावांचं योगदान दिलं. वॉशिंग्टन सुंदरने अखेरच्या षटकापर्यंत सावध खेळी करत कायम होता आणि संघाला गरज असताना त्याने मार्कस स्टॉयनिसच्या अखेरच्या षटकात षटकार खेचत संघाला विजय मिळवून देत माघारी परतला.
पंजाबच्या गोलंदाजांनी देखील सामन्यात सावध गोलंदाजी केली. विजयकुमार वैशाकने २ विकेट्स तर अर्शदीप सिंग, मार्काे यान्सन व मार्कस स्टॉयनिस यांनी १-१ विकेट्स घेतल्या.
गुजरात टायटन्सने सामन्याची नाणेफेक जिंकत पंजाबला फलंदाजीसाठी पाचारण केलं. मोहम्मद सिराजने गोलंदाजीची दणक्यात सुरूवात पहिल्याच षटकात प्रियांश आर्य आणि कुपर कॉनोलीला बाद करत पंजाबला मोठा धक्का दिला. यानंतर प्रभसिमरन सिंग १५ धावा तर कर्णधार श्रेयस अय्यर १९ धावा करत बाद झाले. तर नेहाल वधेरा शून्यावर बाद झाला. ४७ धावांवर ५ विकेट्स अशी अवस्था असताना सूर्यांश शेडगे फलंदाजीला आला आणि त्याने संघाला संकटातून बाहेर काढलं.
सूर्यांशने २९ चेंडूत ३ चौकार व ५ षटकारांसह ५७ धावा केल्या. तर मार्कस स्टॉयनिसने ३० धावा आणि मार्को यान्सने २० धावा केल्या. यासह संघाने २० षटकांत ९ बाद १६३ धावा केल्या. गुजरातकडून जेसन होल्डरने ४ षटकांत २४ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. तर कगिसो रबाडा व मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर रशीद खानने एक विकेट घेतली.
