GT beat RR by 77 Runs and climbs 2nd spot in IPL 2026 Points table: गुजरात टायटन्सनने राजस्थान रॉयल्सला १५२ धावांवर सर्वबाद करत ७७ धावांनी दणदणीत विजय नोंदवला आहे. या विजयासह गुजरातने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी उडी घेतली आहे. तर राजस्थानचा संघ टॉप-४ मधून बाहेर पडला आहे. राशीद खान व जेसन होल्डरच्या गोलंदाजीच्या बळावर गुजरातने राजस्थानचा सहज पराभव केला.

गुजरात टायटन्सनने प्रथम फलंदाजी करताना गिल आणि सुदर्शनच्या भागीदारीच्या बळावर २० षटकांत २२९ धावांचा डोंगर उभारला. तर प्रत्युत्तरात राजस्थानच संघ १६.३ षटकांत अवघ्या १५२ धावा करत सर्वबाद झाला. मधल्या षटकांमध्ये रशीद खानच्या फिरकीने सामना गुजरातच्या बाजूने वळवला.

गुजरात टायटन्सने दिलेल्या २२९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाह करताना राजस्थानला वैभव सूर्यवंशीने चांगली सुरूवात करून दिली होती. पण सिराजने वैभवला बाद केल्यानंतर राजस्थानच्या फलंदाजीला सुरूंग लागला. सूर्यवंशी १६ चेंडूत ३ चौकार व ३ षटकारांसह ३६ धावा करत बाद झाला. तर कर्णधार असलेला यशस्वी जैस्वाल ३ धावा करत बाद झाला. ध्रुव जुरेलने १० चेंडूत २४ धावा कुटल्या, पण रशीदच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. हेटमायर फक्त ६ धावांचं योगदान देण्यात यशस्वी ठरला.

रवींद्र जडेजाने ३८ धावा करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्याला समोरून अपेक्षित साथ नाही मिळाली. शुभम दुबेने १५ धावा तर दासुन शनाकाने १६ धावांचं योगदान दिलं. रशीद खानने मधल्या षटकांमध्ये ४ विकेट्स घेत राजस्थानच्या फलंदाजांना झटपट माघारी धाडलं. रशीदने ध्रुव जुरेल, डोनावन फरेरा, शुभम दुबे या फलंदाजांना क्लीन बोल्ड केलं तर राजस्थानचा डाव सावरणाऱ्या जडेजाला पायचीत करत गुजरातला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. रशीदशिवाय जेसन होल्डरने ३ विकेट्स घेतल्या, तर कगिसो रबाडाने २ तर सिराजने १ विकेट घेतली.

राजस्थानने नाणेफेक जिंकत गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. गुजरातसाठी हा निर्णय एकदम योग्य ठरला आणि संघाने दणक्यात सुूरूवात केली. साई सुदर्शन व शुबमन गिल या जोडीने पहिल्या विकेटसाठी ६५ चेंडूत ११८ धावांची भागीदारी रचली. तर साई सुदर्शन ३६ चेंडूत ६ चौकार व २ षटकारांसह ५५ धावा करत बाद झाला. तर शुबमन गिलने ४४ चेंडूत ९ चौकार व ३ षटकारांसह ८४ धावांचं योगदान दिलं. जोस बटलर १३ धावा, तर जेसन होल्डर ७ व राहुल तेवतिया १४ धावा करत बाद झाले. याशिवाय वॉशिंग्टन सुंदरने २० चेंडूत २ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ३७ धावांचं योगदान दिलं. यासह गुजरातचा संघ प्रथम फलंदाजी करताना २२९ धावा करू शकला.

राजस्थानकडून बृजेश शर्माने सर्वाधिक २ विकेट्स तर यश राज पुंजा व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या. राजस्थान रॉयल्सच्या प्लेऑफच्या आशांना या पराभवामुळे मोठा धक्का बसला आहे. आता त्यांना उर्वरित ३ सामन्यांपैकी २ सामने जिंकायचे आहेत.