Anshul Kamboj Record: आयपीएल २०२६ स्पर्धेतील १९ व्या हंगामातील ६६ वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या दोन्ही संघांसाठी या हंगामातील साखळी फेरीतील शेवटचा सामना होता. या सामन्यात गुजरातने चेन्नईवर दमदार विजय मिळवला आणि टॉप २ मध्ये आपलं स्थान निश्चित केलं. हे हंगाम चेन्नई सुपर किंग्स संघातील गोलंदाज अंशूल कंबोजसाठी रोलर कोस्टर राईडपेक्षा कमी राहिलेलं नाही. आधी तो पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर होता. पण हंगाम संपता संपता त्याच्या नावे नकोसा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. काय आहे तो रेकॉर्ड? जाणून घ्या.
आयपीएल २०२६ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकलेला नाही. या संघातही एकापेक्षा एक स्टार युवा खेळाडू आहेत पण कधी खेळाडूंची तर कधी नशिबाची साथ न मिळाल्याने हा संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकलेला नाही. काही खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. त्यापैकीच एक नाव म्हणजे मध्यमगती वेगवान गोलंदाज अंशूल कंबोज.
अंशूल कंबोजने या हंगामातील १४ सामान्यांमध्ये गोलंदाजी करताना २१ गडी बाद केले. यादरम्यान त्याने २५.२३ च्या इकॉनॉमिने तब्बल ५३० धावा खर्च केल्या. यादरम्यान त्याच्या गोलंदाजीवर एकूण ३४ षटकार लगावले गेले. यासह आयपीएलच्या एकाच हंगामात सर्वाधिक षटकार लगावल्या गेलेल्या गोलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी पोहोचला आहे. याआधी हा नकोसा रेकॉर्ड गुजरात टायटन्स संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रशीद खानच्या नावे होता. रशीद खानच्या गोलंदाजीवर २०२५ मध्ये झालेल्या हंगामात एकूण ३३ षटकार लगावले गेले होते.
आयपीएलच्या एकाच हंगामात सर्वाधिक षटकार खाणारे गोलंदाज
अंशूल कंबोज – ३४ षटकार (२०२६)
रशीद खान – ३३ षटकार (२०२५)
मोहम्मद सिराज – ३१ षटकार (२०२२)
कगिसो रबाडा – ३१ षटकार (२०२६)
वानिंदू हसरंगा – ३० षटकार (२०२२)
युजवेंद्र चहल -३० षटकार (२०२४)
चेन्नईचा पराभव
या सामन्यात गुजरातचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सला २० षटकांअखेर २२९ धावा करता आल्या. यादरम्यान शुबमन गिल, जोस बटलर आणि साई सुदर्शन या तिघांनी अर्धशतकं झळकावली. तर या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नईचा डाव अवघ्या १४० धावांवर आटोपला. चेन्नईने हा सामना ८९ धावांनी गमावला.
