Gujarat Giants vs UP Warriorz: महिला प्रीमियर लीग स्पर्धेतील दुसरा सामना युपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात युपी वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरातच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. कर्णधार ॲशले गार्डनर आणि अनुष्का शर्माच्या दमदार खेळीच्या बळावर गुजरातने युपीसमोर २०८ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना युपीच्या फलंदाजांनी पूर्ण जोर लावला,पण २० षटकांअखेर ८ गडी बाद १९७ धावांपर्यंत मजल मारता आली.

युपी वॉरियर्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २०८ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना युपी वॉरियर्स संघाला चांगल्या सुरुवातीची गरज होती. पण किरण नवगिरे १ एक धाव करत माघारी परतली. तर कर्णधार मेग लेनिंगने ३० धावांची खेळी केली. तर फिब लिचफील्डने ७८ धावा चोपल्या. हरलिन देओल शून्यावर माघारी परतली. तर दीप्ती शर्मा १ धाव करत माघारी परतली.

गुजरातच्या फलंदाजांनी उभारला २०७ धावांचा डोंगर

गुजरात जायंट्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण मिळालं होतं. प्रथम फलंदाजी करताना गुजरातकडून बेथ मुनीने १३ धावांची खेळी केली. तर सोफी डिवाईनने ३८ धावा केल्या. अनुष्का शर्माने ४४ धावा केल्या. तर कर्णधार ॲशले गार्डनरने ६५ धावा केल्या. शेवटी फलंदाजी करताना जॉर्जिया वेअरहॅमने २७ धावा चोपल्या. तर भारती फुलमालीने नाबाद १४ धावा केल्या. या खेळीच्या बळावर गुजरात जायंट्सने ४ गडी बाद २०७ धावा केल्या.

फिब लिचफील्डची झुंज अपयशी

यूपी वॉरियर्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावांचा यशस्वी पाठलाग करायचा होता. या धावांचा पाठलाग करताना फिब लिचफील्डने एकाकी झुंज दिली. तिने ४० चेंडूंचा सामना करत ८ चौकार आणि ५ षटकारांचा साहाय्याने ७८ धावांची खेळी केली. पण यूपीचा संघ विजयापासून १० धावा दूर राहिला.