मुंबई : ‘आयपीएल’ची बाद फेरी सर्वप्रथम गाठणाऱ्या गुजरात टायटन्सनी रविवारी आव्हान संपुष्टात आलेल्या चेन्नई सुपर किंग्जला नमवून गुणतालिकेतील अव्वल दोन संघांमधील स्थानाचा निर्धार केला आहे.
हार्दिक पंडय़ाच्या कुशल नेतृत्वाखालील गुजरातने दोन सामने बाकी असतानाच बाद फेरीमधील स्थान पक्के केले आहे. गुजरातचा संघ १८ गुणांसह गुणतालिकेत आघाडीवर आहे. त्यामुळे रविवारी आणखी एका विजयासह अव्वल दोन संघांतील स्थान नक्की झाल्यास अंतिम फेरीची अतिरिक्त संधी मिळेल.
युवा सलामीवीर शुभमन गिल (३८४ धावा), कर्णधार हार्दिक (३४४ धावा), डेव्हिड मिलर (३३२ धावा), वृद्धिमान साहा (२१४ धावा) आणि राहुल तेवतिया (२१५ धावा) यांच्यावर गुजरातच्या फलंदाजीची प्रमुख भिस्त आहे. तसेच मोहम्मद शमी (१६ बळी), लॉकी फग्र्युसन (१२ बळी) व रशिद खान (१५ बळी) हे जागतिक स्तरावरील गोलंदाज त्यांच्याकडे आहेत.
चेन्नईसाठी यंदाचा हंगाम हा झगडणारा ठरला आहे. आतापर्यंत ४ विजय त्यांना मिळवता आले आहेत. रवींद्र जडेजाला नेतृत्व सोपवण्याचा महेंद्रसिंह धोनीचा निर्णय चुकीचा ठरला. त्यानंतर जडेजाकडून पुन्हा कर्णधारपद धोनीकडे आले. जडेजाने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर चेन्नईशी त्याचे बिनसल्याच्या चर्चासुद्धा ऐरणीवर आहेत. चेन्नईच्या फलंदाजीची मदार ऋतुराज गायकवाड (३१३ धावा), शिवम दुबे (२८९ धावा), अंबाती रायुडू (२७१ धावा), डेव्हॉन कॉन्वे (२३१ धावा) आणि रॉबिन उथप्पा (२३० धावा) यांच्यावर आहे, तर गोलंदाजीची जबाबदारी ड्वेन ब्राव्हो (१६ बळी), मुकेश चौधरी (१६ बळी) आणि माहीश ठीकशाना (१२ बळी) यांच्यावर आहे.
’ वेळ : दुपारी ३.३० वा.
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदूी, सिलेक्ट १ (एचडी वाहिन्यांसह)