विराट कोहलीच्या अफलातून फॉर्मच्या बळावर बाद फेरीत धडक मारणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची क्वालिफायर १ लढतीत सातत्यपूर्ण प्रदर्शन करणाऱ्या गुजरात लायन्सशी लढत होत आहे.

घरच्या मैदानावर, चाहत्यांच्या प्रचंड प्रतिसादासमोर खेळत असल्यामुळे बंगळुरू संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. साखळी फेरीत गच्छंतीची टांगती तलवार अशा अवस्थेतून बंगळुरू संघाने आमूलाग्र सुधारणा करीत बाद फेरीअखेर गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. विराट कोहली बंगळुरूसाठी हुकमी एक्का आहे. कोहलीने आतापर्यंत ९१.९०च्या सरासरीने ९१९ धावा केल्या आहेत. यामध्ये चार शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे.

कोहलीला कसे रोखायचे हा गुजरात संघापुढील यक्षप्रश्न आहे. ख्रिस गेल आणि एबी डी’व्हिलियर्स यांना सूर गवसणे गुजरातसाठी डोकेदुखी ठरू शकते. अष्टपैलू शेन वॉटसनमुळे बंगळुरूच्या संघाला संतुलन मिळाले आहे. दिल्लीविरुद्धच्या विजय अनिवार्य असणाऱ्या लढतीत बंगळुरूच्या गोलंदाजांनी दिमाखदार प्रदर्शन केले होते. ख्रिस जॉर्डन, श्रीनाथ अरविंद, युझवेंद्र चहल यांना धावा रोखतानाच विकेट्सही मिळवल्या आहेत. कोहलीवरचे अवलंबित्व बंगळुरूला टाळून सर्वसमावेशक खेळ करावा लागेल.

नवा संघ असूनही गुजरात लायन्स संघाने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. ब्रेंडन मॅक्क्युलम, आरोन फिंच, सुरेश रैना या त्रिकुटाने पॉवरप्लेचा प्रभावी उपयोग केला आहे. ड्वेन स्मिथने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही आघाडय़ांवर योगदान दिले आहे. दिनेश कार्तिकला फलंदाजीत सुधारणा करावी लागेल. ड्वेन ब्राव्हो, धवल कुलकर्णी, प्रवीण कुमार, रवींद्र जडेजा यांच्यासमोर कोहलीला रोखण्याचे आव्हान आहे. डेल स्टेन किंवा जेम्स फॉकनर यांच्यापैकी एकाला संधी मिळणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

बेशिस्त वर्तनाबद्दल वॉटसनला ताकीद

दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या सामन्यात अपशब्द उच्चारल्याबद्दल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन याला ताकीद देण्यात आली आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या संयोजन समितीने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. वॉटसन याने आयपीएल स्पर्धेतील खेळाडू व संघाच्या पदाधिकाऱ्यांकरिता केलेल्या नियमांचे उल्लंघन केले आहे. आपल्याकडून ही चूक झाली असल्याची कबुली त्याने दिली आहे असेही आयपीएलच्या पत्रकात म्हटले आहे.

गुजरात लायन्स : सुरेश रैना (कर्णधार), ड्वेन ब्राव्हो, जेम्स फॉकनर, आरोन फिन्च, ब्रेंडन मॅक्क्युलम, ड्वेन स्मिथ, डेल स्टेन, प्रवीण तांबे, इशन किशन, रवींद्र जडेजा, शदाब, जाकाती, दिनेश कार्तिक, शिविल कौशिक, धवल कुलकर्णी, प्रवीण कुमार, प्रदीप सांगवान, जयदेव शाह, उमंग शर्मा, अ‍ॅन्ड्रय़ू टाय, सरबजित लड्डा, अक्षदीप नाथ, अमित मिश्रा, पारस डोग्रा, एकलव्य द्विवेदी.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), शेन वॉटसन, ए बी डी’व्हिलियर्स, डेव्हिड विसी, अ‍ॅडम मिल्ने, ख्रिस गेल, स्टुअर्ट बिन्नी, केन रिचर्डसन, ट्रेव्हिस हेड, प्रवीण दुबे, विक्रमजित मलिक, इक्बाल अब्दुल्ला, सचिन बेबी, अक्षय कर्णेवार, विकास टोकस, के.एल. राहुल, परवेझ रसूल, अबू नचिम, हर्षल पटेल, केदार जाधव, मनदीप सिंग, सर्फराझ खान, एस. अरविंद, वरुण आरोन, युझवेंद्र चहल, टॅब्रेझ शामसी.

थेट प्रक्षेपण : सेट मॅक्स, सोनी सिक्स आणि सोनी ईएसपीएन

सामन्याची वेळ : रात्री ८ पासून