IPL 2022 Final : गुजरात टायटन्सचा राजस्थानवर ‘रॉयल’ विजय, पदार्पणाच्या हंगामात पटकावले विजेतेपद

हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखाली गुजरात टायटन्सने आपले पहिले आयपीएल विजेतेपद पटकावले आहे.

Gujarat Titans
संग्रहित छायाचित्र

IPL 2022 Winner : इंडियन प्रीमियर लीग या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या १५व्या हंगामाला आपल्या विजेता मिळाला आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने सात गडी राखून राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे. आपल्या पहिल्याच हंगामामध्ये थेट अंतिम सामन्यात धडक मारलेल्या गुजरात टायटन्सची लढत राजस्थान रॉयल्ससोबत झाली. गुजरातने क्वॉलिफायर १ सामन्यात राजस्थानचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. तर, क्लॉलिफायर २ दोन लढतीमध्ये राजस्थानने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला होता. अंतिम सामन्यात पोहचलेले दोन्ही संघ तुल्यबळ समजले जात होते. मात्र, राजस्थानच्या संघाला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करणे शक्य झाले नाही.

राजस्थान रॉयल्सच्या संघाने दिलेल्या १३१ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या गुजरातचीही सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर वृद्धीमान साहा आणि त्यापाठोपाठ आलेला मॅथ्यू वेड झटपट बाद झाल्याने प्रतिस्पर्धी राजस्थानच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, कर्णधार हार्दिक पंड्या आणि शुभमन गिल यांनी ५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेले. ही जोडी विजेतेपदापर्यंत पोहचेल असे वाटत असताना हार्दिक पंड्या ३४ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या डेव्हिड मिलरने शुभमनच्या साथीने संघाला आयपीएल विजेतपदावर कब्जा करण्यास मदत केली.

त्यापूर्वी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याचा हा निर्णय संघासाठी घातक ठरला. आतापर्यंत प्रत्येक सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या राजस्थानच्या फलंदाजांनी अंतिम आणि अतिमहत्त्वाच्या सामन्यात सपशेल नांग्या टाकल्या. गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी भेदक मारा केल्यामुळे राजस्थानची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली. जोस बटलर (३९) वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला आपल्या लौकिकाला साजेशी धावसंख्या गाठता आली नाही.

गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने राजस्थानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने सर्वात जास्त तीन गडी बाद केले. त्यामध्ये जोस बटलर, संजू सॅमसन आणि शिमरोन हेटमायर या स्फोटक फलंदाजांचा समावेश होता. साई किशोरने दोन तर शामी, यश दयाल आणि राशीद खान यांनी प्रत्येकी एक बळी मिळवत आपल्या कर्णधाराला पुरेपुर मदत केली होती.

आयपीएलच्या यावर्षीच्या हंगामात गुजरातच्या संघाचा नव्यानेच समावेश करण्यात आला होता. आपल्या पदापर्णाच्या हंगामात विजेतेपद मिळवून गुजरात टायटन्सने सर्वांची ‘वाहवा’ मिळवली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gujarat titans beat rajasthan royals lifted ipl 2022 trophy in debut season vkk

Next Story
IPL 2022 Final GT vs RR Final : बीसीसीआयच्या नावे अनोख्या विक्रमाची नोंद, तयार केली जगातील सर्वात मोठी क्रिकेट जर्सी
फोटो गॅलरी