क्वालिफायर १च्या लढतीत टॉसवेळी समालोचक रवी शास्त्री यांनी गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलला विचारलं की संघात काही बदल आहेत का? त्याने उत्तर दिलं- हो, अर्शद खानऐवजी कुलवंत खेजरोलिया. हे वाक्य आणि हा निर्णय गुजरात टायटन्सच्या पराभवाचं कारण ठरू शकतं हे शुबमन आणि गुजरात टायटन्सच्या संघव्यवस्थापनाला वाटलं नसावं.

गुजरात टायटन्स हा भसाभसा संघात बदल करणाऱ्या संघांपैकी नाही. त्यामुळेच क्वालिफायर१ सारख्या महत्त्वपूर्ण लढतीत हंगामात एकही लढत न खेळलेल्या कुलवंत खेजरोलियाला घेण्याचा त्यांचा निर्णय चाहत्यांना आश्चर्यचकित करणारा होता. गुजरात टायटन्सने यंदाच्या हंगामात कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, रशीद खान या चौकडीकडे गोलंदाजीची धुरा सोपवली. हंगामात सुरुवातीला त्यांनी वेगवान अशोक शर्माला खेळवलं. त्यानंतर संघाला संतुलन मिळवून देण्यासाठी ग्लेन फिलीप्सऐवजी जेसन होल्डरला संधी दिली. होल्डर संघात आला आणि गुजरातचं नशीब पालटलं. रबाडा-सिराज-प्रसिध यांना हक्काचा साथीदार मिळाला. त्याचवेळी फलंदाजीतही आवश्यकचा भासल्यास धावा करणारा अनुभवी साथीदार मिळाला. निसर्गाने दिलेल्या उंचीचा अचूक उपयोग करत होल्डरने प्रतिस्पर्धी फलंदाजांना जेरीस आणलं. आयपीएल स्पर्धेत तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा सगळा अनुभव होल्डरने कामी आणत गुजरातच्या विजयात सातत्याने मोलाची भूमिका बजावली. हंगामाच्या उत्तरार्धात गुजरातने डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शद खानला अंतिम अकरात खेळवलं. काटक शरीरयष्टीचा अर्शद अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो. मंगळवारच्या महत्त्वपूर्ण लढतीत गुजरातने अर्शदऐवजी कुलवंतला खेळवण्याचा निर्णय घेतला.

गुजरातचा कर्णधार शुबमन गिलने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातकडे गोलंदाजीचे ७ पर्याय होते. तरीही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २५४ धावांचा डोंगर उभारला. विराट कोहली आणि वेंकटेश अय्यर आज मोठी खेळी करू शकले नाहीत पण बंगळुरूने पॉवरप्लेच्या ६ ओव्हरमध्ये ७६ धावा फटकावल्या. जेसन होल्डरने एकाच ओव्हरमध्ये विराट कोहली आणि सुरेख फॉर्मात असलेल्या देवदत्त पड्डीकलला बाद केलं. ९६/३ या स्थितीतून कर्णधार रजत पाटीदार आणि कृणाल पंड्या यांनी डाव सावरला. रशीद खानने टाकलेल्या दुसऱ्या षटकात केवळ ३ धावा झाल्या. मात्र होल्डर आणि प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर कृणालने फटकेबाजी करत धावा वसूल केल्या. गिलने १३वी ओव्हर कुलवंतला देण्याचा निर्णय घेतला. दोन महिन्यांच्या स्पर्धेत कुलवंतची ही पहिलीच ओव्हर होती. आयपीएलमध्ये खेळण्याचा पूर्ण अनुभव पणाला लावत कुलवंतने या ओव्हरमध्ये फक्त ३ धावा दिल्या. कृणाल-रजत दोघांनीही कुलवंतसमोर सावध पवित्रा घेतला.

पहिली ओव्हर शिस्तबद्ध टाकल्याने कुलवंतचं कौतुक झालं. दुसऱ्या बाजूने प्रसिधच्या षटकात १२ धावा निघाल्या. गिलने कुलवंतला दुसरी ओव्हर देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने सामन्याचं पारडं फिरू शकतं याचा अंदाज गिलला आला नसावा. पहिल्या चेंडूवर कृणालने एकेरी धाव काढली. दुसऱ्या चेंडूवर रजतने एक धाव काढली. तिसऱ्या चेंडूवर कृणालने सफाईदरपणे टोलवर चौकार वसूल केला. कृणालने नोबॉलसाठी रिव्ह्यू घेतला. थर्ड अंपायरने नोबॉल असल्याचं जाहीर केलं. कुलवंतचा पुढचा चेंडू वाईड देण्यात आला. वैध अशा तिसऱ्या चेंडूवर कृणालने चौकार वसूल केला. चौथा चेंडू नोबॉल देण्यात आला. फ्री हिटचा पुरेपूर फायदा उठवत रजतने चौकार लगावला. भरकटलेल्या कुलवंतच्या पाचव्या चेंडूवर रजतने खणखणीत षटकार चोपला. भरीस भर म्हणून रजतने शेवटच्या चेंडूवर चौकारही लगावला. अशा पद्धतीने रजत-कृणाल जोडीने २८ धावा फटकावल्या. कुलवंत कशा पद्धतीने गोलंदाजी करतो आहे याचा अंदाज रजत-कृणाल जोडीने घेतला. त्याच्या दुसऱ्या षटकात गठ्ठयात धावा वसूल करत बंगळुरूने पारडं फिरवलं.

त्याआधीच्या प्रसिधने टाकलेल्या षटकात उसळत्या चेंडूवर रजतने पूलचा फटका लगावला. चेंडू फाईन लेग किंवा डीप स्केव्अर लेगऐवजी विकेटकीपरच्या मागे गेला. विकेटकीपर जोस बटलर उलटा मागे धावत गेला. त्याचवेळी कुलवंतही कॅच घेण्यासाठी सरसावला. दोघेही चेंडूच्या टप्प्यात आले. टक्कर होऊ नये या विचाराने बटलरने धावण्याचा वेग कमी केला. कुलवंतने झेल टिपण्याचा प्रयत्न केला मात्र तो त्याच्या हातून निसटला. बटलरने चेंडू बाऊंड्री जाऊ दिला नाही. बंगळुरूने २ धावा घेतल्या. रजत त्यावेळी १४ धावांवर होता. या जीवदानाचा फायदा उठवत रजतने ३३ चेंडूत ५ चौकार आणि ९ षटकारांसह नाबाद ९३ धावांची खेळी साकारली.

संपूर्ण हंगामात कुलवंतला एकाही सामन्यात खेळायला मिळालं नाही. काही सामन्यात इम्पॅक्ट प्लेयर म्हणून त्याच्या नावाचा समावेश होता. पण त्याला संघात घेण्यात आलं नाही. प्लेऑफच्या महत्त्वपूर्ण लढतीत अचानकपणे त्याला खेळवून गुजरातने जुगार खेळला. हा कुलवंतवर अन्याय होता. कुलवंतने पहिलं षटक अफलातून टाकलं मात्र दुसऱ्या षटकात त्याची एकाग्रता हरपली.

कोण आहे कुलवंत खेजरोलिया?

कुलवंत २०१८ पासून आयपीएल स्पर्धेत खेळतो आहे. सुरुवातीला तो मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. मात्र मुंबईकडून अंतिम अकरात खेळायची त्याला संधी मिळाली नाही. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील दमदार कामगिरीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ८५ लाख रुपये खर्चून त्याला ताफ्यात घेतलं. दोन वर्षात त्याला पाच सामन्यात संधी मिळाली. २०२३ मध्ये तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला. २० लाख रुपये देऊन कोलकाताने त्याला संघात घेतलं होतं. त्या हंगामात तो दोन सामने खेळला. गेल्या वर्षापासून तो गुजरात टायटन्स संघाचा भाग आहे. गेल्या वर्षी त्याला एका सामन्यात खेळायची संधी मिळाली होती. त्यानंतर तो थेट आजच्या क्वालिफायरच्या महत्त्वाच्या सामन्यात खेळला. २०१८ ते २०२६ इतक्या वर्षात कुलवंत केवळ नऊच सामने खेळला आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मध्य प्रदेश आणि दिल्लीकडून खेळणाऱ्या कुलवंतने २७ सामन्यात ७३ विकेट्स पटकावल्या आहेत.

बंगळुरूच्या खेळाडूंना माहिती

कुलवंत दोन वर्ष बंगळुरू संघाकडून खेळला होता. त्यामुळे विराट कोहलीसह बंगळुरूचे काही खेळाडू आणि संघव्यवस्थापनाला कुलवंतच्या गोलंदाजीची माहिती होती. कुलवंतच्या दुसऱ्या षटकात बंगळुरूने हल्लाबोल करत त्याची लय बिघडवली.