Kagiso Rabada Record: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ३० वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात मुंबईचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सला गुजरातकडून कगिसो रबाडाने सुरूवातीलाच ३ मोठे धक्के दिले. त्याने सलामीवीर दानिश मालेवार, क्विंटन डीकॉक आणि सूर्यकुमार यादवला बाद करत माघारी धाडलं. यादरम्यान त्याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

कगिसो रबाडाने मोडला लसिथ मलिंगाचा रेकॉर्ड

या सामन्यात कगिसो रबाडाने पावरप्लेमध्ये दमदार गोलंदाजी केली. दरम्यान आयपीएल स्पर्धेत पावरप्लेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विदेशी गोलंदाजाचा रेकॉर्ड हा मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या नावावर आहे. त्याच्या नावे या स्पर्धेतील पावरप्लेमध्ये गोलंदाजी करताना एकूण ७२ गडी बाद करण्याची नोंद आहे. या यादीत आता कगिसो रबाडाचा समावेश झाला आहे. त्याने पावरप्लेमध्ये गोलंदाजी करताना आतापर्यंत ३८ गडी बाद केले आहेत. यासह त्याने मुंबईचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. त्याने या स्पर्धेत ३७ गडी बाद केले होते.

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. सलामीला आलेला दानिश मालेवार स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर क्विंटन डीकॉकनेही पॅव्हेलियनची वाट धरली. २ मोठे धक्के बसल्यानंतर सूर्यकुमार यादवही बाद होऊन माघारी परतला. हे तिन्ही फलंदाज पावरप्ले संपायच्या आत तंबूत परतले. या तिन्ही फलंदाजांना कगिसो रबाडाने बाद करत माघारी धाडलं.

मुंबईचा दणदणीत विजय

रबाडाच्या दमदार गोलंदाजीमुळे मुंबईला हवी तशी सुरुवात मिळाली नव्हती. पण शेवट दमदार झाला. तिलक वर्माने नमन धीरसोबत मिळून संघाचा डाव सांभाळला. दोघांनी महत्वपूर्ण भागीदारी केली. नमन धीरने ४५ धावांचे योगदान दिले. तिलक शेवटपर्यंत उभा राहिला. त्याने ४५ चेंडूंमध्ये नाबाद १०१ धावांची खेळी केली आणि संघाची धावसंख्या १९९ धावांवर पोहोचवली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्सचा डाव अवघ्या १०० धावांवर आटोपला. यासह मुंबईने हा सामना ९९ धावांनी आपल्या नावावर केला. मुंबईकडून गोलंदाजी करताना अश्वनी कुमारने सर्वाधिक ४ गडी बाद केले.