खंडप्राय अशा देशात, प्रचंड उकाडा आणि आर्द्रता यांचा सामना करत दोन महिने खेळल्यानंतर एका आठवड्यापेक्षाही कमी कालावधीत तीन सामने खेळण्याची वेळ आयपीएल फायनलमध्ये खेळणाऱ्या गुजरात संघावर ओढवली आहे. संपूर्ण हंगामात सातत्यपूर्ण प्रदर्शन करत गुजरातने प्लेऑफ्समध्ये धडक मारली. मात्र फायनलच्या महत्त्वपूर्ण मुकाबल्याआधी त्यांना सरावासाठी तसंच विश्रांतीसाठी पुरेसा वेळच मिळालेला नाही.

२६ एप्रिल रोजी गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात धरमशाला इथे क्वालिफायर १चा मुकाबला झाला. बंगळुरूने संघाने गुजरातवर दणदणीत विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली. गुजरातच्या संघाला दुसरी संधी मिळणार होती. २७ तारखेला गुजरातचा संघ धरमशाला इथून न्यू चंदीगढ अर्थात मुल्लापूर इथे पोहोचला. धरमशाला हे हिमालयाच्या पायथ्याशी वसलेलं मैदान आहे. हाय अॅल्टिट्यूटमुळे फरक पडतो. चेंडू स्विंग होतो. बाकी देशभरात कुठेही खेळताना खेळाडू काही मिनिटात घामाने भिजून जात असल्याचं चित्र होतं. मात्र धरमशाला इथे खेळाडूंना स्वेटर घालावे लागतात.

गुजरातच्या संघाने २८ तारखेला सराव केला. २९ तारखेला त्यांच्यासमोर क्वालिफायर२च्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचे आव्हान होते. राजस्थानने दिलेलं २१५चं धावांचं आव्हान गुजरातने ७ विकेट्स आणि ८ चेंडू राखून पार केलं आणि फायनलमध्ये प्रवेश केला. सामना संपल्यानंतर मुलाखती, पुरस्कार वितरण सोहळा, हॉटेलपर्यंत प्रवास हे आटोपायला १ तरी वाजतो.

३० तारखेला गुजरातचा संघ फायनलसाठी अहमदबादला रवाना झाला. मात्र धुळीच्या वादळामुळे त्यांचं विमान चंदीगढमध्येच खोळंबलं. अहमदाबादमध्ये त्यांना पोहोचायला रात्रीचे दहापेक्षा जास्त वेळ झाला. ३० तारखेला प्रवास आणि रिकव्हरी हे दोन्ही होतं. प्रवासाचा खोळंबा झाल्यामुळे फायनलआधी २४ तास देखील गुजरातचा संघ अहमदाबादला पोहोचू शकला नाही.

फायनलचा मुकाबला रविवारी रात्री ७.३०ला वाजता सुरू होत असला तरी खेळाडू वॉर्मअप आणि खेळपट्टीचा अंदाज घेण्यासाठी २ ते ३ तास लवकर पोहोचतात. चाहत्यांच्या प्रचंड संख्येमुळे टीम बसला पोहोचायला वेळ लागत असल्याने त्यांना लवकर निघावं लागतं. त्यामुळे दुपारी ३च्या बेतात निघावं लागतं. त्यामुळे रात्री उशिरा पोहोचलेल्या गुजरात संघाला फारसा वेळच मिळालेला नाही.

वर्षानुवर्षे आयपीएल प्लेऑफ सामन्यांचं वेळापत्रक असंच असतं. म्हणूनच प्राथमिक फेरीअखेरीस गुणतालिकेत टॉप२ मध्ये स्थान पटकावण्यासाठी संघ आतूर असतात. गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या संघाला एलिमिनेटरचा खेळावा लागतो. जो संघ विजेता ठरतो त्यांना क्वालिफायर२चा खेळायचा असतो. तो सामना जिंकल्यास फायनलचा सामना खेळावा लागतो.

याचप्रमाणे टॉप२ मध्ये स्थान पटकावूनही क्वालिफायर१ ची लढत हरणाऱ्या संघाला ६ दिवसात ३ ठिकाणी ३ सामने खेळावे लागतात. धरमशाला-न्यू चंदीगढ-अहमदाबाद अशा एकमेकांपासून सर्वस्वी विभिन्न वातावरणात खेळण्याचं आव्हान गुजरात संघासमोर आहे. दुसरीकडे २६ तारखेला क्वालिफायर१चा मुकाबला जिंकत फायनल गाठलेल्या बंगळुरू संघाला विश्रांती आणि प्रवासासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. ते पाच दिवसांनी खेळत आहेत. दुसरीकडे गुजरातचा संघ दमलेल्या अवस्थेत खेळतो आहे.

दोन महिने देशभरात प्रचंड उकाडा आणि आर्द्रतेत खेळल्यानंतर संघांना थोडी विश्रांती मिळावी अशी अपेक्षा आहे पण तशी रचनाच नाही. प्लेऑफच्या सामन्यांमध्ये थोडा अवधी ठेवल्यास हे मुकाबली आणखी रंजक होऊ शकतात. गुजरात संघाने २०२३ मध्ये पदार्पणाच्या वर्षातच जेतेपद पटकावण्याची किमया केली होती. चार हंगामात त्यांनी तिसऱ्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश करत ताकद दाखवून दिली आहे.