नवी दिल्ली : भारताचा दोम्माराजू गुकेश ‘अपघाताने’ बुद्धिबळातील जगज्जेता झाला. त्याने नशिबाने हा किताब जिंकल्याची टीका माजी जगज्जेत्या अनातोली कार्पोव यांनी केली आहे. विशेष म्हणजे, कार्पोव यांनी स्वत: पहिले विश्वविजेतेपद १९७५ मध्ये अमेरिकन खेळाडू बॉबी फिशरने माघार घेतल्यामुळे मिळवले होते.
गुकेशने २०२४च्या जागतिक अजिंक्यपद लढतीत चीनच्या डिंग लिरेनला ७.५-६.५ अशा फरकाने नमवत सर्वांत युवा जगज्जेता ठरण्याचा मान मिळवला होता. ‘‘भारतीय खेळाडू (गुकेश) योगायोगाने जगज्जेता झाला, कारण चिनी खेळाडू डिंगला अपेक्षित खेळ करता आला नाही. त्या सामन्यात चिनी खेळाडूला विजयाची सहज संधी होती, पण त्याला ती साधता आली नाही. त्याने जिंकायला हवा असा सामना गमावला. तसे झाले नसते, तर तोच जगज्जेता राहिला असता,’’ असे कार्पोव यांनी रशियातील एका वृत्तपत्राला सांगितले.
‘‘मी अजूनही मॅग्नस कार्लसनलाच जगज्जेता मानतो. अधिकृतरीत्या हा किताब गुकेशकडे असला, तरी कार्लसनने जागतिक अजिंक्यपदाची लढत खेळणे बंद केल्याने त्याला हे यश मिळवता आले आहे,’’ असेही कार्पोव पुढे म्हणाले.
याआधी व्लादिमिर क्रॅमनिक आणि रशियन बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष आंद्रे फिलातोव्ह यांनीही गुकेशच्या विजयावर टीका केली होती.
