पीटीआय, ग्लासगो
भारताचा लांब पल्ल्याचा धावपटू गुलवीर सिंगने पाच हजार मीटर शर्यतीत कांस्यपदकाची कमाई केली. एकाच राष्ट्रकुल स्पर्धेत दोन पदके मिळविणारा गुलवीर भारताचा पहिला धावपटू ठरला. गुलवीरने यापूर्वी दहा हजार मीटर शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली होती.
यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत बॉक्सिंग, वेटलिफ्टिंगपाठोपाठ ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारात खेळाडूंची कामगिरी चमकदार राहिली. ॲथलेटिक्स प्रकारात एकाही सुवर्णपदकाची कमाई नसली, तरी भारताने पाच रौप्य आणि पाच कांस्य अशा दहा पदकांची कमाई केली. भारताची राष्ट्रकुल स्पर्धेतील ही दुसर्या क्रमांकाची कामगिरी ठरली. यापूर्वी नवी दिल्ली २०१० स्पर्धेत भारताने या क्रीडा प्रकारात दहा पदकांची कमाई केली होती.
विद्यमान आशियाई विजेता असलेल्या गुलवीरने ॲथलेटिक्स स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी पाच हजार मीटर शर्यत १३ मिनिटे २४.९५ सेकंदात पूर्ण करत तिसरे स्थान मिळवले आणि ऐतिहासिक दुसरे पदक मिळविले. या शर्यतीत केनियाच्या मॅथ्यू किपचुम्बा किपसांगने १३:२३.६१ वेळेसह सुवर्णपदक जिंकले, तर ऑस्ट्रेलियाच्या काय रॉबिन्सनने १३:२४.७० वेळेसह रौप्य पदक मिळवले. रॉबिन्सनने या पूर्वी दहा हजार मीटरमध्ये सुवर्ण जिंकले होते.
मात्र, ५००० मीटर आणि १०,००० मीटर दोन्ही प्रकारात राष्ट्रीय विक्रम नावावर असलेला २८ वर्षीय गुलवीर त्याच्या १३:०३.९३ या हंगामातील सर्वोत्तम वेळेपेक्षा खूप मागे राहिला. राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने नोंदवलेली वेळ त्याच्या १२:५९.७७ या राष्ट्रीय विक्रमापेक्षाही खूप दूरची राहिली. तीन वर्षांपूर्वी २०२३ च्या हांगझो आशियाई क्रीडा स्पर्धेत १०,००० मीटरमध्ये कांस्यपदक जिंकणार्या गुलवीरने संपूर्ण शर्यतीत आघाडीच्या खेळाडूंमध्ये आपले स्थान टिकवून ठेवले आणि शेवटच्या लॅपमध्ये वेग वाढवला. त्याने केनियाच्या कॉर्नेलियस केम्बॉईला अवघ्या ०.०४ सेकंदांनी मागे टाकत कांस्यपदक निश्चित केले. केम्बॉई हा जूनमध्ये १२:५६.०२ ची वेळ नोंदवणारा ‘सब-१३’ धावपटू आहे, परंतु गुलवीरने त्याला अगदी थोड्या फरकाने नमवले.
पुरुषांच्या पोल वॉल्ट प्रकारात राष्ट्रीय विक्रम धारक देव कुमार मीना ५.३० मीटर उंची पार करून चौथ्या स्थानावर राहिला, तर त्याचा सहकारी कुलदीप कुमार ५.१० मीटरसह सहाव्या स्थानावर राहिला. मिश्र ४ बाय ४०० मीटर रिले अंतिम फेरीत विशाल टी. के., अनसा बाबू, संतोष कुमार तमीळरासन आणि रशदीप कौर या भारतीय चौकडीने ३ मिनिटे २०.३२ सेकंद वेळेसह आठ संघांच्या स्पर्धेत सहावे स्थान मिळवले.
ज्युदोत इशरुप पदकापासून वंचित
ज्युदो स्पर्धेत भारताच्या इशरुप नारंग हिला महिलांच्या ७८ किलो वजनी गटातून पदकापासून वंचित रहावे लागले. स्पर्धेत रिपेचेज फेरीत कॅमेरुनच्या भक्कम बांध्याच्या जॉर्जिका वेस्ली डजेंग्यु मौने हिचा पराभव करुन कांस्यपकाची लढत खेळण्याची संधी इशरुपला मिळाली होती. मात्र, कांस्यपदकाच्या लढतीत कॅनडाच्या कोरालिए गॉडबाऊट कडून तिला निर्णायक पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तिला पदकापासून वंचित रहावे लागले. या लढतीनंतर भारताची यंदाची राष्ट्रकुल मोहिम संपन्न झाली. त्यापूर्वी पुरुषांच्या १०० किलो वजनी गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये अवतार सिंगला सायप्रसच्या अरिस्टोस मायकेलकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या शंभर किलोपेक्षा अधिक वजनी गटात यश घंघास याला वेल्सच्या जोशुआ व्हाइटहाउसकडून गुणावर पराभव पत्करावा लागला.
सायकलिंगमध्ये अपयश
भारताचा सायकलिंगमधील प्रवास पदकाशिवाय संपुष्टात आला. पुरुषांच्या १००० मीटर टाईम ट्रायल प्रकारात रोनाल्डो सिंग लैतोंजम २० व्या स्थानावर राहिला, तर हर्षवीर सिंग सेखों आणि दिनेश कुमार हे पुरुषांच्या ४० किमी पॉईंट्स रेसच्या पात्रता फेरीतूनच बाद झाले. ‘ख्रिस हॉय वेलोड्रोम’ येथे झालेल्या पॉईंट्स रेसच्या पात्रता फेरीतील पहिल्या शर्यतीमध्ये सेखों आपली शर्यत पूर्ण करू शकला नाही, तर दिनेश कुमार १२ सायकलपटूंच्या पात्रता फेरीत ११ व्या स्थानावर राहिला. प्रत्येक पात्रता फेरीमधील अंतिम तीन खेळाडू या स्पर्धेतून बाद होतात. त्यानंतर दिवसाच्या उत्तरार्धात झालेल्या पुरुषांच्या १००० मीटर टाईम ट्रायल प्रकारात रोनाल्डोने १:०४.१९१ अशी वेळ नोंदवत २० वे स्थान मिळवले.
केनिया आणि इतर आफ्रिकन देशांतील धावपटूही माणूसच आहेत आणि आपणही माणसे आहोत. मग आपण त्यांना का हरवू शकत नाही? जर आपण कठोर परिश्रम घेतले आणि सरकारचा असाच पाठिंबा मिळत राहिला, तर भारतीय खेळाडू ॲथलेटिक्समध्ये खूप चांगली कामगिरी करू शकतात. मी या कांस्यपदकामुळे आनंदी आहे, पण मला अजून बरीच पदके जिंकायची आहेत. माझी पदकांची भूक अजून मिटलेली नाही. – गुलवीर सिंग.
