गुरुवारी पाकिस्तानमधील मुल्तान शहरात एक धक्कादायक प्रकार घडल्याने खळबळ उडाली. कर्णधार बेन स्ट्रोक्सच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा क्रिकेट संघ सज्ज असतानाच हा संघ वास्तव्यास असलेल्या हॉटेलपासून एक किलोमीटरच्या अंतरावर गोळीबार झाला. १७ वर्षानंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर असलेल्या इंग्लंडच्या संघाने रावळपिंडीमधील पाहिला कसोटी सामना जिंकला आहे. या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून सुरु होणार असून त्याआधीच हा गोळीबाराचा प्रकार घडल्याने इंग्लंडच्या संघाच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

तीन सामन्यांच्या या मालिकेमध्ये पाहुणा इंग्लंड संघ १-० ने आघाडीवर असतानाच दुसरा सामना आजपासून खेळवला जाणार आहे. मुल्तानच्या क्रिकेट मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ मैदानापासून काही अंतरावर असलेल्या एका हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे. याच हॉटेलपासून काही अंतरावर गुरुवारी गोळीबार झाल्याची घटना घडली.

nashik pakistan zindabad slogans marathi news
उपनगर पोलीस ठाण्याबाहेर जमावाकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, भाजप आमदार देवयानी फरांदे यांची तक्रार
Hyderabad beat Punjab by 2 runs
SRH vs PBKS : हैदराबादविरुद्धच्या पराभवासाठी शिखर धवनने कोणाला जबाबदार धरले? ‘या’ दोन खेळाडूंची वारंवार घेतली नावे
Loksatta anvyarth A terrorist attack on Pakistan naval air base in Balochistan province
अन्वयार्थ: अनागोंदीचा आणखी एक पाकिस्तानी पैलू
Five Chinese nationals and their Pakistani driver were killed
पाकिस्तानात चीनच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरूच; आत्मघातकी हल्ल्यात पाच चिनी अभियंते ठार

‘द इंडिपेंडन्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणामध्ये पाकिस्तानी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. इंग्लंडचा संघ मुल्तानच्या मैदानावर सरावाला निघण्याच्या काही वेळआधीच गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. इंग्लंडच्या संघाला पाकिस्तानमध्ये राष्ट्राध्यक्षांना पुरवली जाते त्या दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. गोळीबार झाल्यानंतरही इंग्लंडच्या संघाने सरावला जाण्याचा निर्णय घेतल्याने नियोजित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.

पाकिस्तानवर ७४ धावांनी विजय मिळवलेल्या इंग्लंड दुसऱ्या सामन्यामध्ये मालिका विजयाच्या उद्देशानेच मैदानावर उतरणार आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाविरुद्ध दुसऱ्या सामन्यात इंग्लंड मार्क वुडला संधी देण्याची दाट शक्यता आहे. लियाम लिविंगस्टोनच्या जागी वुडला खेळवला जाईल. लिविंगस्टोनच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने त्याला विश्रांती दिली जाईल. “१५० किमी प्रति तासापेक्षा अधिक वेगाने चेंडू टाकणारा गोलंदाज संघात असणं हे कोणत्याही संघासाठी चांगलं आहे. तो ज्या प्रकारे गोलंदाजी करतो आणि त्याच्या समावेशाने गोलंदाजीवर जो प्रभाव पडणार आहे तो आमच्यासाठी फार मोठा परिणामकारक ठरु शकतो. प्रतिस्पर्धांचे २० गडी बाद करण्याची क्षमता त्याच्यामुळे नक्कीच वाढेल,” असं विश्वास स्टोक्सने एएफपी या वृत्तसंस्थेशी वूडबद्दल बोलताना व्यक्त केला.

२००९ साली पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकन संघाच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. लाहोरमधील गद्दाफी मैदानाच्या दिशेने जाणाऱ्या श्रीलंकन संघाच्या बसवर १२ हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. सुदैवाने यामध्ये कोणत्याही खेळाडूचा गंभीर दुखापत झाली नाही. या हल्ल्यानंतर मैदानातच हेलिकॉप्टर बोलवून श्रीलंकन संघाला सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. या हल्ल्यानंतर जवळजवळ एका दशकाहून अधिक काळ कोणत्याही परदेशी संघाने पाकिस्तानचा दौरा केला नव्हता.