Duleep Trophy 2026 Gurnoor brar: दुलीप ट्रॉफीमध्ये नुकताच भारताकडून वनडेमध्ये पदार्पण केलेल्या गुरनूर ब्रारने कमालीचा चेंडू टाकला आणि फलंदाजाला त्रिफळाचीत केला. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाकडून एकाही कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नसली, तरी मैदानात उतरताच गुरनूर ब्रारने जबरदस्त प्रभाव पाडला आहे. दुलीप करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ‘साउथ झोन’विरुद्ध गुरनूर ब्रारने उत्कृष्ट गोलंदाजी केली.

पहिल्या डावात अप्रतिम स्विंग आणि सीम गोलंदाजीचे प्रदर्शन करत गुरनूरने साउथ झोनच्या आघाडीच्या फळीला खिंडार पाडलं. गुरूनूर ब्रारने सामन्यात ४ विकेट्स घेतल्या होत्या. साऊथ झोन संघाने ८० धावांमध्ये ५ विकेट्स गमावल्या होत्या आणि याचं श्रेय गुरनूर ब्रारच्या नावे होतं. पण त्याने नारायण जगदीशनला बाद करण्यासाठी टाकलेल्या चेंडूची सगळीकडे चर्चा होत आहे.

नॉर्थ झोनसाठी अर्शदीप सिंग आणि अंशुल कंबोज यांनी गोलंदाजीची सुरुवात केली. कंबोजने रिकी भुईला अवघ्या ५ धावांवर बाद केलं. मात्र, त्यानंतर गोलंदाजीला आलेल्या गुरनूर ब्रारने धुमाकूळ घातला. या वेगवान गोलंदाजाने शेख रशीदला खातंही उघडू दिलं नाही. त्यानंतर त्याने नारायण जगदीसनची विकेट घेतली; ज्या चेंडूवर ब्रारने जगदीसनला बाद केलं, त्या चेंडूवर खेळणं फलंदाजासाठी बिलकुल सोपं नव्हतं.

गुरनूरने टाकलेला चेंडू लेग-स्टंपच्या दिशेने जात होता, पण नंतर आतल्या बाजूला स्विंग झाला आणि त्याने ऑफ-स्टंप उडवला; जगदीशला त्या चेंडूचा अजिबातच अंदाज आला नाही. जगदीशन पुढे वाकून तो चेंडू खेळला पण स्विंग झालेला चेंडूने कधी ऑफ स्टंप उडवला, हे त्याला कळलं देखील नाही. गुरनूरच्या या जादुई चेंडूची सगळीकडे चर्चा होत आहे आणि या विकेटचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

जगदीशनच्या विकेटनंतर ब्रारने रविचंद्रन स्मरन आणि कोडिमेला हिमातेजा यांच्याही विकेट्स घेतल्या. या सामन्यात गुरनूरने केवळ आपल्या स्विंगनेच नव्हे, तर वेग आणि उसळीनेही फलंदाजांना अडचणीत आणलं. गुरनूर ब्रारला टीम इंडियाचा पुढील सुपरस्टार वेगवान गोलंदाज मानलं जात आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला पदार्पणाची संधी मिळू शकते. भारतीय संघ १९ नोव्हेंबरला न्यूझीलंडविरुद्ध पहिली कसोटी खेळणार असून, त्यात गुरनूरला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. या २६ वर्षीय वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत १९ सामन्यांत ६२ प्रथम श्रेणी बळी घेतले आहेत. तसेच, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही त्याने चांगली कामगिरी केली असून, ६ सामन्यांत ११ बळी मिळवले आहेत.